पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी
प्रतिनिधी /बेळगाव
कन्नडबरोबरच मराठी भाषेत परिपत्रके द्यावीत, यासाठी 25 मे 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी घोषणा दिल्यामुळे मराठी भाषिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. बुधवारी सुनावणी होती. मात्र ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून 21 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
सीमाभागामध्ये मराठी भाषिक मोठय़ा संख्येने राहतात. तेव्हा मराठी भाषेमध्येही सर्व सरकारी कागदपत्रे द्यावीत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मराठी भाषिकांनी कर्नाटकविरोधात घोषणाबाजी केली म्हणून मार्केट पोलिसांनी दीपक दळवी, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, संभाजी पाटील (मयत), दिगंबर पाटील, अरविंद पाटील, सरिता पाटील, सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, संजय शिंदे, महेश जुवेकर, सूरज कणबरकर, गणेश दड्डीकर, मदन बामणे, रत्नप्रसाद पवार, निंगोजी हुद्दार, हणमंत मजुकर यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्केट पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 143, 147, 153 ए, 188, 505(2), 240 सहकलम 149 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यामध्ये या सर्वांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. शंकर पाटील हे काम पाहत आहेत.









