प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या महामारीत बिम्स प्रशासन हतबल झाले असून जिल्हा रुग्णालयात रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. अशावेळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून कोविड आयसोलेशन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
कोणतीही सरकारी मदत नसताना लोकवर्गणीतून हे सेंटर चालविण्यात येत आहे. गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जायंट्स मेन या संघटनेने ज्या-ज्या वेळी अशी आपत्ती ओढवली त्यावेळी सतत मदतीचा हात पुढे केला आहे.
यावेळी जायंट्स मेनने समितीच्या कोविड सेंटरला 51 हजार रुपयांची भरीव देणगी देऊन सामाजिक कार्यास हातभार लावला आहे. मंगळवारी दुपारी मराठा मंदिर येथे जायंट्स मेनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे यांच्याकडे या निधीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मोहन कारेकर, सुनील भोसले, विजय बनसूर, लक्ष्मण शिंदे, पेमानंद गुरव, राहुल बेलवलकर, सुनील मुरकुटे, महादेव केसरकर, अरविंद पालकर, आनंद कुलकर्णी उपस्थित होते.









