बेळगाव : म. ए. युवा समितीतर्फे शुक्रवारी आमदार निलेश लंके यांची निपाणी येथे भेट घेतली. सीमाभागात बहुसंख्य मराठी भाषिक असतानाही येथे कानडीकरणाचा वरवंटा फिरविला जात आहे. मराठी नाटक, चित्रपट, साहित्यिक येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जातात. या ना त्या कारणाने मराठीची गळचेपी होत असून, याला महाराष्ट्र विधानसभेत वाचा फोडावी, अशी मागणी युवा समितीने त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सीमाप्रश्नासाठी नियुक्त उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्राच्या सुविधा पुरवाव्यात. सीमा समन्वय मंत्र्यांची नियुक्ती करावी, हुतात्म्यांच्या वारसांना पेन्शन सुरू करावी. यासह विविध मागण्या त्यांच्याकडे केल्या. विधान भवनात आपण नक्की आवाज उठवू, असे आश्वासन त्यांनी युवा समितीला दिले.
अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सूरज कुडुचकर, श्रीकांत कदम, प्रवीण रेडेकर, राजू कदम, आशिष कोचेरी, प्रथमेश मण्णूरकरसह इतर उपस्थित होते.









