बेंगळूर/प्रतिनिधी
सध्या कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका टाळता येतो. दरम्यान, कर्नाटकात ब्लॅक फंगसचे सुमारे ५०० रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान म्हैसूरमध्ये पंधरवड्याच्या कालावधीत ब्लॅक फंगसच्या संसर्गामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर म्हैसूर जिल्ह्यात ‘ब्लॅक फंगस’चे संसर्ग झालेल्यांची संख्या ५० वर गेली आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे ते सर्व कोविड -१९ रूग्ण आहेत. शनिवारी, म्हैसूरमध्ये ब्लॅक फंगसची ५४ प्रकरणे नोंदली गेली. या संसर्गातून सहा रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर पाच रुग्णांचा ब्लॅक फंगसमुळे बळी गेला आहे.









