विविध मागण्यांसाठी भाजपा नेते, शेतकरी आक्रमक
प्रतिनिधी / मिरज
शेती पिकांसाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करुन पाणी द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील मालगांव येथील भाजपा नेते, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला. पंचायत समिती माजी उपसभापती व सदस्य काकासाहेब धामणे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, सदस्य अरुण राजमाने, मालगाव सरपंच अनिता क्षीरसागर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तात्काळ म्हैसाळ जलसिंचन योजनेचे आवर्तन सुरू करुन शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यासमवेत रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.