म्हासुर्ली/वार्ताहर
नवीन प्रस्तावित असणाऱ्या बेळगाव–गोवा या आंतरराज्य मार्गावरील म्हासुर्ली (ता.राधानगरी) ते चौधरवाडी (ता.गगनबावडा) हा अवघ्या अर्धा किमीच्या रस्त्यासह नदीवरील नियोजित पुलाकडे शासनाच्या सर्वच विभागानीं दुर्लक्ष केले आहे. परिणामी सध्या या रस्त्यासह कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक कोकण व गगनबावडा तालुक्यात होत असून बंधारा मृत्युचा सापळा बनला आहे.
म्हासुर्ली ते चौधरवाडी रस्ता दोन तालुके जोडणारा असून सुमारे अर्धा किमीचा रस्ता आंतरराज्य रस्त्यातीलच एक भाग असला तरी अजूनही शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव–निपाणी ते परिते–राशिवडे–चांदे–कोते मार्गे म्हासुर्ली– धुंदवडे – अणदूर मार्गे गगनबावडा ते कोकण – गोवा असा कमी अंतराचा नवीन रस्ता प्रस्तावित असून त्यास कोट्यावधी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे या मार्गावर काही ठिकाणी कामे ही सुरु झाली आहेत. याच मुख्य रस्त्यावरील म्हासुर्ली बाजारपेठ ते चौधरीवाडी अशा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता याला अपवाद ठरला असून शासनाच्या संबंधित विभागाने गार्भियाने घेतले नसल्याने रस्ता पूर्णतः माती मधील कच्या स्वरुपात अरूंद अस्तित्वात आहे. परिणामी रस्ता वाहतूकीच्या दृष्टीने धोक्याचा बनला आहे. तर नदीवरही मोठा उंचीचा पूल नसल्याने सध्या पाटबंधारे विभागाच्या अरुंद अशा कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरून जीवघेणी वाहतूक कोकण व गगनबावडा तसेच पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील साखर कारखान्याकडे सुरु आहे.
पावसाळ्यात तर सदर रस्तावरून पावसाचे मोठ्या प्रमाणावर वाहणारे पाणी , दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडे झुडपे, तसेच चिखल आणि मोठमोठे खड्डे यामुळे वाहतुक चार महिने बंद पडते. तसेच पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे या रस्त्याचा काही भाग खचू गेला आहे. त्यामुळे खड्याचे साम्राज निर्माण झाल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदच नसल्याची माहिती पुढे आली आहे .