दै.तरुण भारत वृत्ताची घेतली दखल, जनतेतून समाधान
युवराज भित्तम / म्हासुर्ली
अतिवृष्टीसह प्रचंड महापुरामुळे निपाणी – परिते ते गगनबावडा या नव्याने तयार झालेल्या राज्य मार्गावरील धामणी नदीवरील म्हासुर्ली (ता.राधानगरी ) ते चौधरवाडी ( ता. गगनबावडा ) दरम्यान असलेल्या धामणी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील भरावा रस्ता वाहून गेल्याने मोठी भगदाडे पडून खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद पडली होती. याबाबत दै.तरुण भारतमध्ये सडेतोड वृत्त प्रसिध्द होताच प्रशासनाने दखल घेतली. व वाहून गेलेल्या भराव ठिकाणी मुरम टाकून घेत रस्ता वाहतूकीस चांगला केला. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नवीन पूल उभारणीबाबत पाहणी करत शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.
म्हासुर्ली (ता.राधानगरी) ते चौधरवाडी (ता.गगनबावडा) गावांच्या दरम्यान असणाऱ्या धामणी नदीवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने परिसरातील शेतीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी सुमारे १२-१३ वर्षापूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे. मात्र या बंधाऱ्यात पाणीसाठा करण्या बरोबरच बंधाऱ्यावरून धामणी खोऱ्यासह कोकण व गगनबावड्याकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्याने सदर बंधाऱ्यास महत्व प्राप्त झाले आहे.
मात्र सदर बंधाऱ्याकडे शासनाच्या सर्वच विभागाचे दुर्लक्ष झाल्याने बंधाऱ्याची दुरावस्था होत चालली आहे. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे बंधाऱ्याच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. परिणामी पूर्व व पश्चिमेकडील भराव खचत चालला होता. मात्र गत वर्षीच्या व नुकत्याच ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पश्चिमेकडील भरावच वाहून गेल्याने शेतीसह बंधाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते. याबाबत दै. तरुण भारत मध्ये विशेष वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासन तात्काळ दखल घेतली. तसेच शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांची म्हासुर्ली – धुंदवडे परिसरातील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत नवीन पूल मंजुर करण्याबाबत मागणी केली. यावेळी आमदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागला सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तर पाटबंधारे विभागाने ही वृत्ताची दखल घेत वाहून गेलेला भराव ठिकाणी नवीन मुरूम टाकून रस्ता वाहतूकीस चांगला केला. तर म्हासुर्ली गाव बाजूने नदीच्या पूर्वेकडे रस्ता शिवसेना शिक्षक नेते युवराज पाटील सर यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून तयार करून घेतला.
तर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित पाटील, शाखा अभियंता प्रविण कदम, यांनी म्हासुर्ली – चौधरवाडी रस्त्यासह धामणी नदीवरील बंधाऱ्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी सदर अधिकारी व ग्रामस्थ शिष्टमंडळाने रस्त्याबाबत चर्चा केली असता सदर रस्ताच नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सदर रस्त्याचा नव्याने सर्व्हे होणे गरजे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी सर्वातोपरी मदत करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे.यावेळी शिवसेना शिक्षक नेते युवराज पाटील, गगनबावडा पं.स.चे माजी सदस्य एम.जी. पाटील, सर्जेराव चौधरी, आबा पाटील, बबन पाटील, बाळू गुरव, महिपती चौधरी,हरिचंद्र पाटील, शामराव पोवार,निवृत्ती पाटील सर्व पत्रकार उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव










