अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी
म्हासुर्ली / वार्ताहर
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असणाऱ्या म्हासुर्ली ते कोनोली तर्फ असंडोली (ता.राधानगरी) दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे निकृष्ट काम ग्रामस्थांनी बंद पाडले होते.यांची तत्काळ दखल शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर घेत संबंधित ठेकेदाराचे बिल थांबविण्या बरोबर दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी असे निर्देश कार्यकारी अभियंता ग्रामीण रस्ते विभाग कोल्हापुर यांना दिले आहेत.
म्हासुर्ली-कोनोली हा चार किमीचा रस्ता आ.आबिटकर यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतुन तीन वर्षापुर्वी मंजुर केला होता.चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर करुन रस्त्याच्या रुंदीकरण, मजबुतीकरण, खडीकरणासह डांबरीकरणाचे काम कोल्हापुरातील निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीने मंदगतीने सुरू ठेवले होते. गेल्या तीन वर्षात फक्त रुंदीकरण खडीकरण व मजबुतीकरण झाले. तर प्रलंबित कार्पेटिंग व सीलकोटचे काम दर्जेदार होणे आवश्यक असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने कारपेंटिंगचे काम सुरू केले होते. मात्र ठेकेदार कंपनीने रस्त्यावरील धूळ बाजूला न करता.तसेच योग्य जाडी न करता अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम सुरू ठेवेले होते.परिणामी केलेले डांबरी करणाचे काम काही तासात उखडून गेले होते.
त्यामुळे मंगळवारी पाटीलवाडी, पखालेवाडी, कोनोली येथील ग्रामस्थ संतप्त होत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत रस्त्याचे काम बंद पाडले होते. तसेच सदर निकृष्ट कामाबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे तक्रार केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल आमदारानी घेत मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांना या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून ठेकेदाराचे बील थांबवून संबंधित कामाची चौकशी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे.