कला अकादमी व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरतर्फे आयोजन

सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
कला अकादमी गोवा व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक पेंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील प्रतिष्ठेच्या ‘नुपूर’ नृत्य महोत्सवाला शुक्रवारी शानदार सुरूवात झाली.
म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीच्या प्रांगणात सुरू झालेल्या या नृत्य महोत्सवाचा आरंभ महालसा देवस्थानचे अध्यक्ष श्रीवल्लभ पै रायतूरकर, भरतनाटय़म् क्षेत्रातील प्रसिद्ध नर्तिका आणि नृत्य शिक्षिका गौरी फळगावकर शेख, कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर, कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर तसेच नाटय़विभागाचे प्रेमानंद पोळे यांच्या उपस्थितीत दिप प्रज्ज्वलनाने झाला.

महोत्सवाच्या पहिल्या सत्रात गोवा कला अकादमीच्या नृत्य विभागाच्या विद्यार्थीनीनी भरतनाटय़म् सादर केले. दक्षिण भारतातील भरतमुनीच्या नाटय़शैलीचे उत्तम सादरीकरण करताना पदलालित्य, अभिव्यक्ती, मुद्राभाव आणि कसदार अदाकारीचे यथार्थ दर्शन सहभागी कलावतींनी घडविले. आदितालावर बांधलेली रचना आणि त्याला जोडूनच दमदार मृदंगवादन समुहातील गायक वादकानी खूप तन्मयतेने सादर करून एकूणच भरतनाटय़म्चा नृत्यविष्कार संस्मरणीय बनविला.
दुसऱया सत्रात पुणे येथील प्रसिद्ध नर्तिका तेजस्वीनी साठे आणि त्याच्या सहकाऱयानी मनोहारी कथक नृत्य सादर करून रसिकांना रिझविले. उत्तर भारतातील हा लोकरंजनाचा नृत्यप्रकार त्यानी अतिशय सुरेख आणि वैशिष्टय़ासह सादर केला. खास करून गत, तोडे, तत्कार, घुंगरू नाद हे प्रकार बारकाव्यासह सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. जोडीला उत्तम स्वरसाथ आणि पोषक तालसंगत यामुळे नुपूर नृत्यमहोत्सवातील पहिला दिवस श्रोत्यासाठी रोचक आणि आनंददायी ठरला.
या महोत्सवाचे रविवार 6 रोजी समारोप होणार असून आज शनिवार 5 रोजी सायं. 7 वा. गोव्यातील मिताली नाईक यांचे भरतनाटय़म्, 8.15 वा. मुंबईतील सुजाता नायर यांचे मोहिनीनृत्य होईल. उद्या 6 रोजी 7 वा. कला अकादमीच्या नृत्य विभागाच्या विद्यार्थीनींचे कथकनृत्य, 8 वा. चेन्नई येथील प्रसिद्ध नर्तिका मिरा श्रीनारायणन यांचे भरतनाटय़म् तर 9 वा. नवी दिल्ली येथील मौमिता घोष यांच्या ओडीसी नृत्याचा कार्यक्रम होईल.
आजच्या नृत्य कार्यक्रमात डॉ. रूपा च्यारी यानी सुत्रसंचालन केले. पं. उल्हास वेलिंगकर, शांतीलाल म्हार्दोळकर, शैलेश म्हार्दोळकर, प्रा. शैलेश गावकर आदींची उपस्थिती श्रोत्यावर्गामध्ये होती.









