प्रतिनिधी / फोंडा
वेलिंग – म्हार्दोळ येथे बाराचाकी अवजड कंटेनरने कारगाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ढवळी-फोंडा येथील 70 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. विश्वनाथ सगुण नाईक (रा. भगवती मंदिराजवळ, ढवळी) असे मयत व्यक्तीचे नाव असून दामू नाईक (45) व शशिकांत नाईक (47) हे त्यांचे दोन मुलगे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी 5 वा. सुमारास पणजी-फोंडा महामार्गावर वेलिंग जंक्शनजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक बराचवेळ खोळंबून राहिली होती.
दामू हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरु आहेत.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ नाईक हे आजारी असल्याने त्यांच्यावर चार दिवसांपासून गोमेकॉत उपचार सुरु होते. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याने दोघेही मुलगे त्यांना जीए 01 आर 2193 या कारगाडीतून घरी घेऊन येत होते. वेलिंग येथील जंक्शनजवळ ते पोचले असता समोरुन भरधाव वेगात येणारा एम. एच. 43 बीजी 9703 या क्रमांकाचा कंटेनर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने एकतर्फी रस्त्यावर घुसला. यावेळी समोरुन येणाऱया एका ट्रकला कंटेनरची निसटती धडक बसली व त्यानंतर कारगाडीवर येऊन धडकला.
दोघे पुत्रही जखमी
कंटनेरच्या या जोरदार धडकेने कारगाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. आंतमध्ये बसलेले विश्वनाथ नाईक यांचा जागीच मृत्यू झाला, तर दामू व शशिकांत हे जखमी झाले. कारगाडीला धडक दिल्यानंतर हा कंटेनर रस्त्यावर एका बाजूला उलटला. कंटेनर रस्त्य़ावर उलटल्याने महामार्गाचा एकतर्फी रस्ता बंद झाला होता.
कंटेनरचालकही जखमी
अपघातानंतर कंटेनरचालक अमित उपाध्याय (27, रा. उत्तर प्रदेश) याने जखमी अवस्थेत घटनास्थळावरुन पळ काढला. शोधाशोध करुन पोलिसांनी म्हार्दोळ येथील मशिदीजवळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्या डोक्याला व कंबरेला दुखापत झाल्याने त्यालाही उपचारासाठी इस्पिळात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे पोलीस फौजफाटय़ासह घटनास्थळी धावले. उपनिरीक्षक रश्मी भाईडकर यांनी मृतदेहाचा तर हवालदार संदीप खाजनकर यांनी घटनेचा पंचनामा केला. महामार्गावरील वाहतूक एकतर्फी मार्गाने वळविण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढल्याने साधारण चार तासानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
मयत विश्वनाथ नाईक हे आजारी असल्यामुळे घरीच असायचे. दामू नाईक हा ढवळी येथील जंक्शनवर भाजी विक्रीचा व्यावसाय करीत असून शशिकांत हा मोटारसायकल पायलट आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या वेलिंग जंक्शनजवळ उतरण व वळण आहे. भरधाव वेगात येणाऱया अवजड वाहनांचा या ठिकाणी तोल जाऊन बरेच अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.









