जि.प.सभापती निवड बिनविरोध
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड मंगळवारी बिनविरोध पार पडली. बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, समाजकल्याण सभापतीपदी ऋतुजा जाधव, शिक्षण व अर्थ सभापतीपदी सुनील मोरे, तर महिला बालकल्याण सभापतीपदी रजनी चिंगळे यांची निवड झाली. या निवडीमध्ये रत्नागिरी, खेड व संगमेश्वर तालुक्यांना नेतृत्वाची संधी मिळाली असून राजापूरला मात्र बगल मिळाली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समिती सभापती पदावर कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. या चारही पदासाठी सत्ताधारी शिवसेनेमध्ये जोरदार चुरस होती. यापूर्वी नियोजनचे सदस्य असलेल्या सदस्यांच्या नावावर पक्षाने काट मारली होती. त्यामुळे सभापतीपदांसाठी रत्नागिरी तालुक्यातून बाबू म्हाप, परशुराम कदम, ऋतुजा जाधव, खेडमधून सुनील मोरे, राजापूरमधून लक्ष्मी शिवलकर यांची नावे अग्रक्रमाने चर्चेत होती.
मंगळवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विकास सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवणुक प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी 11 ते 1 या कालावधीत शिवसेनेच्यावतीने म्हाप, मोरे, जाधव तसेच चिंगळे यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर या चारच उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.
बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी महेश उर्फ बाबू म्हाप (रत्नागिरी मिरजोळे गट), शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदी सुनिल मोरे (खेड-भोस्ते गट), समाजकल्याण समिती सभापतापदी ऋतुजा जाधव (रत्नागिरी-वाटद गट) तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रजनी चिंगळे (संगमेश्वर-दाभोळे गट) यांची निवड झाली. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, जि.प.अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर आदींनी नवनिर्वाचीत सभापतींचे अभिनंदन केले.
या निवडीत रत्नागिरी तालुक्याचा पर्यायाने नामदार उदय सामंत यांचा वरचष्मा दिसून आला. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील सर्वच्या सर्व 10 जि. प. गटातून शिवसेनेच सदस्य विजयी झाले असून त्यातील म्हाप व जाधव यांची वर्णी लागली आहे. समाजकल्याण समिती सभापतीसाठी रत्नागिरी तालुक्यातील परशुराम कदम (हातखंबा गट), ऋतुजा जाधव (वाटद गट) यांची नावे शर्यतीत होती. त्यामध्ये ऋतुजा जाधव यांनी बाजी मारली आहे. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी सुरूवातीपासून राजापूरच्या लक्ष्मी शिवलकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी शिवलकर यांच्याऐवजी रजनी चिंगळे यांना संधी देण्यात आली.
आश्वासन देऊनही डावलले : लक्ष्मी शिवलकर
जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकित निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करत राजापूरातील सागवे गटाच्या सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी आपल्याला संधी मिळेल असे आश्वासन नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र आयत्या वेळी माझ्या नावावर काट मारण्यात आली. प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाला कधी सन्मान मिळणार? असा प्रश्न शिवलकर यांनी उपस्थीत केला आहे. जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.