गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांचे कर्मचाऱयांना आवाहन : धरणे, निदर्शनापेक्षा व्यवस्थापनाकडे चर्चा करा
प्रतिनिधी /पणजी
म्हापसा अर्बन आणि मडगाव अर्बन को. ऑप. बँकेची जी स्थिती झाली तशी परिस्थिती गोवा राज्य सहकारी बँकेवर आणू नये, असे आवाहन गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी बँकेच्या कर्मचाऱयांना केले असून धरणे, निदर्शने करण्यापेक्षा व्यवस्थापनाकडे चर्चा करावी, असा तोडगा सूचवला आहे.
गोवा राज्य सहकारी बँकेचे कर्मचारी शनिवारी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे धरणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेच्या या निर्णयामुळे बँकेची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे. जनमानसात बँकेबद्दल गैरसमज पसरला जाऊ नये म्हणून पत्रकार परिषद बोलवावी लागली, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला अध्यक्षांसमवेत उपाध्यक्ष अरविंद कुर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक अनंत चोडणकर, संचालक प्रेमानंद चावडीकर, कृष्णा काणेकर व उमेश शिरोडकर आदी संचालक उपस्थित होते.
या बँकेचे एकूण 430 कर्मचारी असून हे कर्मचारी दि. 1 एप्रिल 2014 पासूनची थकबाकी मागत आहेत. ती देण्यासाठी बँकेला साधारण 23 कोटी खर्च येणार आहे. एवढी रक्कम बँकेकडे नाही. त्यामुळे 2021 पासून 5 टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव कर्मचाऱयांपुढे मांडला आहे पण कर्मचारी संघटनेने चर्चा करण्याऐवजी दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र सादर करुन धरणे धरण्याचा कार्यक्रम आखला आहे, तो चुकीचा असल्याचे ते म्हणाले.
लोकशाहीत कोण कोणाला थांबवू शकत नाही. त्यामुळे धरणे धरु नये असे आपण कर्मचाऱयांना सांगू शकत नाही पण या कर्मचाऱयांनी किमान व्यवस्थापनाकडे चर्चा करुन तोडगा काढला जाऊ शकतो की नाही हे पहावे, असे ते म्हणाले.
बँकेने गेल्यावर्षी 11 कोटी 24 लाख नफा मिळविला पण यापूर्वीचे सुमारे 9 कोटी 96 लाख रुपयांचे नुकसान होते ते भरुन काढले त्यामुळे फक्त 1 कोटी 28 लाख येवढाच नफा झाला. खाणबंदीमुळे 2012 पासून 80 कोटी रुपयांचे कर्ज माफ करावे लागले. कोविडमुळे सर्व बँकांना मार बसला. बँकेकडे रोख ठेवी येतात पण कर्ज घेणाऱयांची संख्या कमी असल्याने बँक व्यवहारात फटका बसतो, असे ते म्हणाले. आतापर्यंतचा एकूण तोटा 110 कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. बँका बंद पडत आहेत. अशावेळी म्हापसा आणि मडगाव अर्बन को. ऑप.वर पडलेले निर्बंध लक्षात घेऊन कर्मचाऱयांनी वागावे, असे आवाहन त्यांनी केले.









