उपसभापती जोशुआ डिसोझा यांचा पोलिसांना आदेश
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा येथील नवीन कदंब बस स्थानकावरील शौचालयात सापडलेल्या रिकाम्या सिरिंज (इंजेक्शन) विषयी पोलीस तपास करीत आहेत. हे प्रकरण गंभिर असून त्याच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत सखोल चौकशी करा असा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे, अशी माहिती उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी दिली.
म्हापसा येथे आयोजित एका कार्यक्रमावेळी डिसोझा पत्रकारांशी बोलत होते. म्हापसा नवीन बस स्थानकाच्या शौचालयात सिरिंज सापडते ही गोष्ट गंभीर असून कदंब महामंडळाचे अधिकारी आणि नागरी आरोग्य केंद्रालाही याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार पर्यटक प्रवाशांकडून घडला की इतर कुणाकडून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध घ्यावा लागणार आहे. रिकाम्या सिरिंज सापडणे हा गंभीर प्रकार असून पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. सध्या पोलीस याचा तपास करीत आहेत. पण अद्याप काहीही धागेदोरे हाती लागलेले नाहीत असे डिसोझा यांनी सांगितले.
म्हापसा शहरात सध्या भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. म्हापशात रवींद्र भवनासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या भवनासाठी दोन जागांची निवड केली असून हे काम तातडीने सुरू करण्याचा विचार आहे. पण हे काम कधी मार्गी लागेल याची हमी देणे शक्य नाही. म्हापसा मार्केटला गतवैभव मिळवून देण्यासाठी नवीन मार्केट प्रकल्पही हाती घेऊ, असे डिसोझा यांनी सांगितले.
पदाला योग्य न्याय देईन- जोशुआ डिसोझा
विधानसभेचे उपसभापती पद मिळणे हे आपले भाग्य समजतो. ही मोठी जबाबदारी मला मिळाली आहे. या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या पदाची भूमिका ही नेहमीच तटस्थ असावी लागते. सर्वांना विधानसभेत बोलण्याचा समान हक्क मिळेल असे आश्वासन आपण सर्व विधीमंडळ सदस्यांना दिले आहे, असे जोशुआ डिसोझा म्हणाले.









