लिक्विडेटरकडून बडतर्फीची नोटीस
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरीत काढल्यानंतर कधीही नोकरी गमावण्याची टांगती तलवार घेऊन काम करणाऱया म्हापसा अर्बन बँकेच्या कर्मचाऱयांची ती भीती अखेर खरी ठरली आहे. येत्या 1 जुलैपासून त्यांच्या सेवाबडतर्फीची नोटीस बजावण्यात करण्यात आली आहे. मात्र त्याही परिस्थितीत या बँकेच्या मुख्यालयातील काही कर्मचाऱयांना दिलासा मिळाला असून त्यांची नोकरी सध्यातरी शाबूत राहणार आहे.
सुमारे 150 कर्मचाऱयांना ही नोटीस मिळाली असून येत्या 1 जुलैपासून बँकेच्या सेवेतून मुक्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या बँकेवर नियुक्त लिक्विडेटरकडून तसे आदेश देण्यात आले आहेत.
सेवामुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱयांना ग्रॅच्युईटी, प्रिव्हिलेज रजेचे तसेच आजारी रजेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करून सेवा अटी आणि हक्कांनुसार भरपाई देण्यात येणार आहे, असे नोटीसीत स्पष्ट करण्यात आले आहे.
सुमारे 55 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आणि राज्यातील पहिली सहकारी बँक बनण्याचा बहुमान लाभलेल्या म्हापसा अर्बन बँकेला 1998 मध्ये बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त झाला होता. मात्र आर्थिक परिस्थिती खालावत गेल्यामुळे 16 एप्रिल 2020 रोजी आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला होता. त्यामुळे त्या दिवसापासून बँकेचे सर्व व्यवहार थांबविण्यात आले होते. त्यानंतर सरकारने लिक्विडेटर म्हणून दौलत हवालदार यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांनी बँकेच्या ठेविदारांनी आपल्या ठेवींचे दावे लेखी सादर करण्याचे आवाहन केले होते. सध्या अँथोनी डिसा हे लिक्विडेटर म्हणून काम पाहात असून त्यांनीच सर्व कर्मचाऱयांना पत्रे पाठवून सदर निर्णय कळविण्यात आला आहे.
दरम्यान, या बँकेच्या ज्या शाखा भाडोत्री जागेत चालत होत्या तेथील कर्मचाऱयांना यापूर्वी 1 फेब्रुवारी 2021 पासून सेवामुक्त करण्यात आले होते. आता दुसऱया टप्प्यात बँकेच्या स्वमालकीच्या शाखामधील कर्मचाऱयांना सेवेतून कमी करण्यात आले आहेत. त्यांचा सेवाकाळ 1 जुलै 2021 पासून संपुष्टात येणार आहे.









