प्रतिनिधी/ पणजी
म्हादई नदीचे पाणी वळवल्यास त्यांचे गंभीर परिणाम उद्योग क्षेत्रावर होतील आणि कोट्यावधींची उलाढाल बंद पडण्याची भिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केली आहे. असोसिएट चेबंर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजतर्फे आयोजित केलेल्या पणजीतील कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले की लांटबार्से येथे अन्नप्रक्रिया उद्योग पार्क उभारण्यात येणार असून त्याचे काम सुऊ झाले आहे. तेथे विविध उद्योगांना पाचारण करण्यात आले असून तेथील उत्पादनांना बाजारपेठ मिळाली असून पुरक उद्योगांना उत्तेजन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
आगामी काळात पाण्यासाठी तंटे होतील आणि म्हादईपासून त्याची सुऊवात होणार असल्याचा दावा त्यांनी केला. म्हादईच्या पाण्यावर गोव्यातील अनेक उद्योग चालतात जर ते पाणी मिळाले नाही, तर उद्योगांना फाटका बसून ते बंद पडतील असा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. म्हणून म्हादईच्या रक्षणासाठी जनतेसह सर्वांनी एकीने लढा देणे आवश्यक असल्याचे गुदिन्हो म्हणाले.
म्हादई कोणीही वळवू शकणार नाही कर्नाटकात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथील नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हादईच्या बाजूने वाटेल ते बोलत आहेत. त्यांची थापेबाजी चालू असून त्यांची ती फुकटची आश्वासने आहेत. म्हादई गोव्याची आहे आणि तो कोणी वळवू शकत नाही तसेच ती गोव्याशिवाय आणखी कोणाला मिळणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन गुदिन्हो यांनी केले









