गवाळी, कोंगळा, पास्टोली नागरिकांवर संकट
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील नेरसा-गवाळी मार्गावर म्हादई नदीवर बांधण्यात आलेला लोखंडी साकव (पूल) वाहून गेल्याने गवाळी-कोंगळा, पास्टोली या तिन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून त्या गावांना एकप्रकारे अंदमान-निकोबार बेटांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गवाळी, कोंगळा, पास्टोली ही गावे खानापूर शहरापासून जवळपास 28 कि.मी. वर आहेत.
या गावांना जोडणाऱया नेरसा-गवाळी रस्त्यावर भांडुरा नाला आणि म्हादई नदी वाहते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी भांडुरा नाला तसेच म्हादई नदीवर लाकडी साकव बांधून नागरिक ये-जा करत होते. चार वर्षांपूर्वी निजद नेते नासीर बागवान यांनी म्हादई नदीवर स्वखर्चाने लोखंडी साकव बांधून दिला होता. त्यामुळे तिन्ही गावच्या जनतेची चांगली सोय झाली होती. गेल्यावर्षीही तो साकव पुराच्या पाण्यात नादुरुस्त झाला होता. पण वेळीच त्याची दुरुस्ती झाल्याने अडचण निर्माण झाली नव्हती. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे म्हादई नदीला भरपूर पाणी आले आहे. त्या पुरात गुरुवारी हा साकव वाहून गेल्याने गवाळी, पास्टोली, कोंगळा या गावातील जनतेवर मोठे संकट कोसळले आहे. या गावातील महिला व पुरुष गुरुवारी अशोकनगर येथील सरकारी दवाखान्यात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास आले होते. ते सर्वजण लस घेऊन माघारी घरी जाताना तो साकव पार करून गावी पोहोचले. तेवढय़ात तो साकव वाहून गेला. आता यामुळे त्या तिन्ही गावच्या जनतेला म्हादई नदीचे पाणी कमी झाल्याशिवाय गावाबाहेर पडणे कठीण असून पुन्हा त्यांच्यावर आता मोठे संकट ओढवले आहे.
नेरसा-गवाळी रस्त्यावरील भांडूरा नाला तसेच म्हादई नदीवर कायमस्वरुपी लोखंडी पूल उभारण्याची योजना मंजूर झाली आहे. कामाच्या निविदाही झाल्या आहेत. पण लोखंडी पूल उभारण्यास वनखात्याने अद्याप परवानगी न दिल्याने ही योजना रखडली आहे.









