पुढील सुनावणी दि. 13 एप्रिल रोजी
प्रतिनिधी / पणजी
म्हादईचे पाणी खरोखर वळवण्यात आले आहे का, याची पहाणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीला स्वतंत्र अहवाल सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने एका आठवडय़ाची अनुमती दिली असून पुढील सुनावणी दि. 13 एप्रिल रोजी ठेवली आहे.
म्हादई जलतंटा लवादाने दिलेला निवाडा अधिसूचित झाला आहे. या निवाडय़ाप्रमाणे कर्नाटकाला येणारा पाण्याचा वाटा कर्नाटकाने वळवला असा कर्नाटकाने दावा केला होता. पाणी वाटणी समिती व यंत्रणा स्थापन केल्याशिवाय अशी वाटणी करणे शक्य नसल्याचा दावा करून गोवा सरकारने कर्नाटक विरुद्ध न्यायालयीन अवमान याचिका सादर केली होती. ही अवमान याचिका सुनावणीस येताच एक थेंबही पाणी वळवण्यात आलेले नाही, असा दावा कर्नाटकाने केला होता. त्यामुळे सत्यता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या वरिष्ठ अभियंत्यांची या समितीवर नियुक्ती झाली होती. या समितीने जेव्हा म्हादई खोऱयातील जलस्रोतांची पहाणी करण्यासाठी भेट दिली तेव्हा समितीच्या सदस्यांना ज्या प्रकारची वागणूक कर्नाटकाकडून मिळाली त्याचा तपशील गोवा सरकारच्या वकिलांनी सार्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती समोर मांडला आहे.
त्रिसदस्यीय समितीचे एकमत नसल्याने प्रत्येकाला स्वतंत्र अहवाल सादर करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी न्यायपीठासमोर मांडण्यात आली. प्रत्येकाचा स्वतंत्र अहवाल सादर करण्यास यावेळी न्यायालयाने मान्यता दिली व एक आठवडय़ाची मुदत दिली.
पाणी वळवण्यास विरोध
म्हादई खोऱयातील पाणी त्या खोऱयातील जनतेसाठी वापरण्यास गोवा सरकारची कोणतीच हरकत नाही, मात्र ते मलप्रभेत वळवण्यास हरकत आहे. म्हादई नदीच्या पाण्याची वाटणी झाली असली तरी ते पाणी मलप्रभेत वळवण्यास जलतंटा लवादाने आणि सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिलेली नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राची पहिल्यांदाच ठोस भूमिका
म्हादई जलतंटा लवादासमोर बाजू मांडताना महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे कर्नाटकाची बाजू उचलून धरून गोव्याच्या याचिकेचा विरोध केला होता. महाराष्ट्राला मिळालेला वाटा नगण्य असून त्यावर असमाधान व्यक्त करून महाराष्ट्राने पहिल्यांदाच ठोस भूमिका व्यक्त केली आहे.
पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास हवा
म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यात आले तर काय होईल. मलप्रभा नदीची तेवढी क्षमता आहे का? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मलप्रभा नदीत फक्त पावसाळय़ातच पाणी वळवले जाईल, असे कर्नाटकाने यापूर्वी म्हटले होते. पावसाळय़ात मलप्रभेला पूर येतो, त्यात 7 टीएमसी पर्यंत अतिरिक्त पाणी वळवले गेल्यास मलप्रभा नदीच्या काठावरील भागांवर काय परिणाम होईल, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. हे मुद्दे अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी येऊ शकत नसल्याने ते मूळ याचिकेच्या सुनावणीवेळी उपस्थित केले जाणार असल्याचे जलस्रोत खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.









