केंद्रीय पर्यावरण – वन मंत्रालयाची कर्नाटकला नोटिस, गोव्याच्या पत्राची केंद्र सरकारने घेतली दखल
प्रतिनिधी/ पणजी
केंद्र सरकारच्या वन-पर्यावरण मंत्रालयाने म्हादई नदीवर कर्नाटककडून करण्यात येत असलेल्या बांधकाम प्रकल्पाबाबत कर्नाटक सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तसे पत्र त्या सरकारला पाठवले आहे. त्याला कर्नाटक सरकारकडून काय प्रत्युत्तर मिळते याकडे गोवा राज्यासह जनतेचे लक्ष लागले असून त्यावरच म्हादईचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. या पत्रामुळे केंद्र सरकारने काही प्रमाणात म्हादईबाबतच्या गोव्याच्या पत्राची दखल घेतल्याचे समोर आले आहे.
दहा दिवसांपूर्वी म्हणजे 15 जानेवारी रोजी सदर पत्र केंद्राने कर्नाटक सरकारला पाठवले असून त्याची माहिती गोवा सरकारला मिळण्यास एवढा कालावधी का लागला? याबाबतही शंका निर्माण झाली आहे.
गोव्याचे अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी सदर पत्राची माहिती दिली आहे. कर्नाटक सरकारतर्फे म्हादई नदीवर करण्यात येणारे बांधकाम प्रकल्प हे वन्यप्राणी जीवन व अभयारण्याच्या अगदी जवळ आहेत. शिवाय ते जैविक संवेदनशील भागात येतात. प्रामुख्याने कळसा-भांडुरा प्रकल्प त्या क्षेत्रात येतो म्हणून यावर स्पष्टीकरण देण्याची सूचना पेंद्रीय वन-पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला केली आहे.
बांधकामाला परवानगी नको
अॅडव्होकेट जनरल पांगम यांनी सांगितले की, केंद्रीय जल आयोग, केंद्रीय वन-पर्यावरण मंत्रालय व इतर सर्व केंद्रातील संबंधित खात्याच्या मंत्र्यांना म्हादई प्रश्नावर गोवा सरकारतर्फे पत्रे पाठविण्यात आली असून त्यात म्हादईवरील कोणत्याही बांधकामास परवाने देऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे.
वन्य जीव अभयारण्यातून पाणी वळवता येत नाही, आणि म्हादई नदीवर कोणत्याही प्रकारची बांधकामे करणार नाही, अशी हमी कर्नाटक सरकाने सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी दिली होती. या दोन मुद्द्यांच्या आधारे कर्नाटक कोणत्याही बांधकामासाठी म्हादई नदीवर मान्यता देण्यात येऊ नये, अशी याचना केंद्राकडे केल्याचे पांगम यांनी स्पष्ट केले.
केंद्राकडून सकारात्मक पाऊल
गोवा सरकारच्या दृष्टीने हे केंद्र सरकारच्या वन-पर्यावरण मंत्रालयाने सरकारात्मक पाऊल उचलले असून ते दिलासादायक आहे. राज्य सरकारने तेथे पाठविलेल्या पत्राची दाखल घेऊन केंद्राने ते पत्र कर्नाटकला पाठवले असावे, असा अंदाज सरकारी सूत्रांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारतर्फे देण्यात येणारे स्पष्टीकरण या प्रकरणात गोव्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून त्यावरच म्हादईचे भवितव्य अवलंबून आहे.









