भाजपचा दावा : जनतेची दिशाभूल करणाऱया विरोधी नेत्यांचा नोंदवला निषेध
प्रतिनिधी / पणजी
म्हादई प्रश्नावर राज्य सरकारने कायदेशीय लढाई सुरु केली असून सर्वोच्च न्यायालयात गोव्याला न्याय मिळेल असा दावा भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पाठीशी असून म्हादई विषयावर जनतेची दिशाभूल व विनाकारण आगपाखड करणाऱया विरोधी नेत्यांचा भाजपने निषेध नोंदवला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष, नेत्यांवर हल्लाबोल करुन सांगितले की, डॉ. सावंत यांनी घेतलेली भूमिका योग्य असून ते योग्य मार्गाने पुढे जात आहेत. म्हादईचे पाणी गोव्यासाठी महत्त्वाचे असून ते वळवले म्हणून अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची सुनावणी लवकर व्हावी अशी भाजपची भूमिका आहे आणि सर्व पुरावे त्या याचिकेतून सादर करण्यात आल्यामुळे गोव्याला न्याय मिळणार, अशी खात्री त्यांनी वर्तवली.
भाजपच्या सरकारमध्ये असताना मगो नेते सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांची भूमिका काय होती हे सर्वश्रुत आहे. आता सरकारात नसल्यामुळे आणि विरोधी पक्षात बसावे लागल्याने त्या पक्षांनी भूमिका बदलली आहे. आता ते विरोधकाची भूमिका घेत आहेत असे तानावडे यांनी निदर्शनास आणले. डॉ. सावंत यांनी म्हादई प्रश्नावर एकंदरित वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली आहे आणि न्यायालयात अवमान याचिका सादर केली आहे. कर्नाटक जर काही चुकीची कृती करीत असेल तर ते न्यायालयाच्या लक्षात आणून देणे गोव्याचे कर्तव्य आहे आणि ते डॉ. सावंत यांनी बजावल्याचे सावईकर यांनी नमूद केले.
काँग्रेस सरकारमधील तेव्हाचे जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स हे देखील आता भाजप सरकारमध्ये तेच मंत्री असले तरी त्या सरकारचे धोरण वेगळे होते व त्यानुसार मंत्र्यांचे धोरण राहिले. तेव्हा त्यांना आता मंत्रिमंडळातून काढण्याचा प्रश्नच नाही कारण ते आता भाजप धोरणानुसार कार्यरत आहेत, असे स्पष्टीकरण तानावडे यांनी दिले.









