प्रतिनिधी / पणजी :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन म्हादई, मोपा आणि खाणींच्या विषयावर चर्चा केली. म्हादईप्रश्नी आपण गोव्याच्या पाठिशी राहणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. त्याचबरोबर खाणप्रश्नीही केंद्र सरकारने गोव्याच्या पाठिशी रहावे, अशी मागणी आपण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
म्हादई संदर्भात सत्यस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांनी मांडली. आपण पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक सरकारने जे मुद्दे मांडले आहेत त्यांच्याशी गोवा सरकार सहमत नाही. गोव्यासंदर्भात कर्नाटक सरकार चुकीची माहिती केंद्र सरकारला देत आहे. त्यामुळे जे निर्णय गोव्याबाबत घेतले जातात ते चुकीचे ठरत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.
गोव्यात म्हादईचे पाणी वाया जात नाही
गोव्यात म्हादईच्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर होत आहे. म्हादईचे 113 टीएमसी एवढे पाणी मिळते. गोव्यात म्हादईचे पाणी वाया जात नाही. गोव्याला या पाण्याचा पूर्णपणे उपयोग होतो. कर्नाटक सरकार गोव्याचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.
गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही : पंतप्रधान
म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. ही सुनावणी होईपर्यंत केंद्र सरकारने कर्नाटकला कोणत्याही परवाने देऊ नये, अशी मागणी आपण पंतप्रधनांकडे केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी आपण अधिकाऱयांना आवश्यक त्या सूचना देणार तसेच गोव्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईवर प्रकल्प उभारण्यासाठी कर्नाटकला मान्यता दिल्यानंतर गोव्यात या निर्णयाविरोधात मोठा गेंधळ निर्माण झाला होता. विरोधी पक्षासह अन्य विरोधी घटकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनीही सरकारव तीव्र टीका केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गोवा सरकारसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत जाऊन म्हादईप्रश्नी संबंधीत मंत्री आणि अधिकारी यांची भेट घेतली होती. म्हादईप्रश्नी गोव्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी व गोव्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. काल पुन्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नव्याने म्हादईच्या मुद्दय़ावरुन चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदीनीही गोव्यासंदर्भात सहकार्याची भूमिका घेण्याचे आश्वसन दिले. त्याचबरोबर गोव्यावर अन्याय होणार नाही, व केंद्र सरकार गोव्याच्या पाठिशी राहणार असेही आश्वासन दिले.
जिल्हा पंचायत निवडणुकीबाबतही केली चर्चा
यावेळी गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच मोपा विमानतळ व गोव्यातील अन्य काही विकासप्रकल्पांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली.