अन्यथा मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडावी, सेव्ह म्हादई सेव्ह गोवाची मागणी
प्रतिनिधी/ फोंडा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई संबंधी बेळगाव येथील सभेत केलेल्या विधानाचे आजच्या फर्मागुडीतील जाहीर सभेत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेने केली आहे. अमित शहा यांची जाहीर सभा आज रविवार 16 रोजी फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी मैदानावर होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी फर्मागुडी किल्ल्याजवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते प्रशांत नाईक, आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह सेव्ह म्हादईचे शंकर पोळजी, जयेश शेटगावकर आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. गेल्या 27 जानेवारीला बेळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादईच्या विषयावर बोलताना, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वासात घेऊन म्हादईचे पाणी कर्नाटकातील शेतकऱ्यांना वळविल्याची घोषणा केली होती. त्याचे तिव्र पडसाद गोव्यात उमटताच बांधकाममंत्री निलेश काब्राल व जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर शाह यांच्या या विधानावर असहमती दर्शवली होती. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विश्वासात घेतलेले नाही, असा खुलासा केला होता. त्यामुळे अमित शाह बोलले ते खरे होते की, मुख्यमंत्र्यांचे उत्तर विश्वासार्ह आहे याचे स्पष्टीकरण समस्त गोमंतकीय जनतेला आजच्या फर्मागुडीत सभेतून मिळाले पाहिजे. या सभेत गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एकाच व्यासपीठावर असतील. अमित शहा गोव्यासंबंधी म्हादईच्या विधानावर स्पष्टीकरण देत नसल्यास मुख्यमंत्र्यांनी स्वत: आपल्या भुमिकेबाबत खुलासा करावा. अन्यथा गोव्यातील भाजपा सरकारने म्हादईचा सौदा केल्याचे स्पष्ट होईल असे प्रशांत नाईक म्हणाले.
म्हादईचा वाद न्याप्रविष्ठ असताना अमित शहा यांनी कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केलेले हे विधान मुळात विवादास्पद आहे, असे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या. अमित शाह खोटे बोलले की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकशी तडजोड केली हे गोमंतकीय जनतेला कळले पाहिजे. अन्यथा म्हादईच्या मुद्यावर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी गोंयकार भाजपला योग्य धडा शिकवेल. आजच्या फर्मागुडीतील सभेत अमित शाह यांनी म्हादई संबंधी आपली भूमिका स्पष्ट करावी, ज्यामुळे गोमंतकीयांना सत्य कळेल, असे शंकर पोळजी म्हणाले.
‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ संघटना म्हादईच्या मुद्यावर गृहमंत्र्यांचा गोवा भेटीदरम्यान जाहीर निषेध करणार काय ? यावर बोलताना प्रशांत नाईक यांनी अजून तसे काही ठरलेले नाही. कदाचीत निषेध करुही असे संदिग्ध उत्तर दिले.









