प्रतिनिधी / पणजी :
म्हादईच्या रक्षणासाठी मगो पक्ष जनआंदोलन उभारणार असून गोवा निसर्गसंपन्न रहावा व गोव्याचे पाणी आणि जीवन सुरक्षित रहावे असे वाटत असणाऱया प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले आहे. गुरुवारी मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची व कार्यकारिणीची संयुक्त बैठक पणजीत घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
म्हादईमुळेच गोवा हरित व सुंदर आहे. गोव्याच्या दृष्टीने म्हादईचे महत्त्व खुप मोठे आहे. म्हादई आहे म्हणून गोवा हरित आहे, गोवा सुंदर आहे. गोव्यातील मांडवी व अन्य नद्या म्हादईमुळेच दिसतात. म्हादईचे पाणी, खांडेपार, कुंभारजुवे, सांखळी, डिचोली या भागात येते. त्यामुळे या नद्या दिसून येतात. त्यामुळे गोव्याची ही जीवनदायिनी राखण्याची गरज आहे. मगो पक्षाने म्हादईच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारले आहे. गोव्याच्या हितासाठी आणि भवितव्यासाठी गोव्यातील प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सुदिन ढवळीकर यांनी केले.
प्रत्येक मतदारसंघात आंदोलन करणार
कोदाळ, उसगाव, ओपा, सावईवेरे, प्रियोळ, कुंभारजुवे, सांखळी, डिचोली, म्हापसा, पेडणे आदी भागातून हे आंदोलन जाणार आहे. गोव्यातील बहुतेक मतदारसंघ, पंचायत क्षेत्रातून आंदोलन केले जाणार आहे. 19 जानेवारी रोजी उस्ते येथून आंदोलनाला सुरूवात होणार आहे. सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन या ठिकाणी चालणार आहे. जनतेमध्ये म्हादईसंदर्भात जनजागृती करण्याचे काम मगो पक्ष करणार आहे. या कार्यात म्हादईच्या रक्षणासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मगो नेत्यांनी केले. सुमारे 1000 कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार, असेही त्यांनी सांगितले.
मगोप्रमाणे गोव्यात कोणत्याच पक्षाने काम केले नाही
गोवा स्वातंत्र्यानंतर मगो पक्षाने गोव्यासाठी जे काम गेले ते अन्य कोणत्याच पक्षाने केले नाही. 1963 साली मगोचे सरकार आले. गोव्यात मगो पक्षाच्या सरकारने तीन धरणे बांधली. त्यामुळे पाण्याची टंचाई गोव्याला कधीच भासली नाही. शिक्षण उद्योग क्षेत्रात मगोने भरपूर काम केले. एमपीटी, एमआरएफ, संजीवनी यासह अनेक बरेच उद्योग मगोने आणले. आजचे मंत्री संजीवनी साखर कारखाण्याबाबत काहीही बोलतात. त्यांना काहीही माहीत नाही, अशी टीका सुदिन ढवळीकर यांनी केली. 10 कोटी खर्चून संजीवनीचे काम करणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. सेस, आयटी जमिनीसंदर्भात पैसे खाण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बैठकीत तीन महत्वपूर्ण ठराव संमत
या बैठकीत महत्त्वपूर्ण असे तीन ठराव घेण्यात आले. नवीन कार्यकारिणीमध्ये 45 जणांचा सामावेश करण्यात आला आहे. जिल्हा पंचायत निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर मगो पक्षाच्या घटनेत बदल करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. केंद्रीय समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपुष्टात आला, मात्र जिल्हा पंचायत निवडणुका असल्याने नवीन समिती 30 मार्चपर्यंत निवडली जाईल, असेही ते म्हणाले.