पाळेकरवाडी येथील घटना
डॉ. माधव घोगरे यांच्याकडून म्हैशीला जीवदानः एकाच दिवशी म्हशीवर दोन शस्त्रक्रिया
प्रतिनिधी / देवगड:
तालुक्यातील पाळेकरवाडी येथील शंकर पाळेकर यांच्या मालकीच्या ‘मुऱहा क्रॉस’ जातीच्या म्हशीवर देवगड येथील पशुवैद्यकीय अधिकारी माधव घोगरे यांनी एकाच दिवशी दोन शस्त्रक्रिया यशस्वी केला. एका शस्त्रक्रियेतून या म्हशीच्या पोटातून सुमारे 50 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले. तर दुसऱया सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे या म्हशीची प्रसुती करण्यात आली. तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर या म्हशीला जीवदान देण्यात आले.
श्री. पाळेकर यांच्या मालकीची मुऱहा क्रॉस जातीच्या म्हशीची प्रसुती आठवडाभर होत नव्हती. याची माहिती त्यांनी डॉ. घोगरे यांना दिली. डॉ. घोगरे यांनी तात्काळ आपल्या टीमसमवेत पशुपालक पाळेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी म्हशीची तपासणी केली असता डॉ. घोगरे यांनी प्राथमिक अंदाजात म्हशीच्या गर्भाशयाला पीळ पडल्यामुळे नैसर्गिक प्रसुती होणे अशक्य असल्याचे सांगितले. पशुपालक पाळेकर यांच्या परवानगीनंतर डॉ. घोगरे यांनी म्हैशीची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. ही शस्त्रक्रिया करताना डॉ. घोगरे यांना म्हशीच्या पोटात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचे तुकडे असल्याचे समजले. या प्लास्टिकच्या गठ्ठय़ांमुळे पिंड खाली दबले गेले असून म्हशीच्या जीवितासही धोका असल्याचे डॉ. घोगरे यांच्या लक्षात आले. त्यांनी म्हशीच्या पोटातून प्लास्टीक बाहेर काढण्यासाठी पहिली शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेद्वारे त्यांनी म्हशीच्या पोटातून सुमारे 50 किलो प्लास्टिकचे गोळे, कपडय़ांचे तुकडे, दावे (दोरीचे तुकडे) बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे म्हशीची यशस्वी प्रसुती करून तिला जीवदान दिले. या शस्त्रक्रियेसाठी सहाय्यक म्हणून स्वप्नील परब व अमोल पवार यांची मदत डॉ. घोगरे यांना मिळाली.









