मुकबधीर ज्येष्ठ दाम्पत्यांच्या नशिबी अंधारच : जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनी सरकारने दखल घ्यावी
प्रतिनिधी / फोंडा
म्हलारीमळ-कोडली तिस्क येथील ‘त्या’ ज्येष्ठ दिव्यांग दाम्पत्याला न्याय देण्याचे सोडा त्याच्या स्वत:च्या मालकी हक्क असलेल्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या ठपका ठेवत किर्लपाल दाभाळ पंचायतीने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. जगभर आज ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारने या दाम्पत्यांना न्याय मिळवून देण्यात मुकबधीराची भूमिका बजावली आहे. आजच्या हायटेक जमान्यात फाईल कम्प्युटरवरून सरकत असतानाही त्याच्या नशीबी मात्र फाईल या खात्यातून त्या खात्यात दाद मागण्यासाठी खेपा घालणेच लिहून ठेवलेले आहे का? असा सवाल आज ज्येष्ठ नागरिक दिनी दिव्यांगानी उपस्थित केला आहे.
म्हलारीमळ येथील सर्व्हे नं. 30/32 या जमिनीत बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याची रितसर तक्रार प्रतिभा गावकर यांनी पंचायतीकडे केली आहे. त्यानुसार सरपंच शकुंतला गावकर यांनी ही नोटीस जारी केली आहे. दिव्यांग दाम्पत्य संतोष भानू गावकर (74) व सुलक्षा संतोष गावकर (63) ही त्याची मुलगी तारा गावकर ही मागील 25 वर्षापासून सदर घरात राहत आहेत. सदर दाम्पत्यांनी आपल्या जागेतून तीन रस्ते कोणाच्या परवानगीने बनविले याचे उत्तर त्यांना सरकार दरबारी कुठल्याच खाते मिळत नसल्याची व्यथा प्रसारमाध्यमांशी माडली हीच काय त्यांची चूक.
पंचायतीनुसार ना हरकत दाखला आहे, दिव्यांग म्हणतात दाखला बनावट
याप्रकरणी पंचायत मंडळाने आपली बाजू स्पष्ट करताना मालकी हक्क असलेल्य सर्वाकडून तीस वर्षापुवी ना हरकत दाखल घेण्यात आल्याचा दावा केला होता. बेकायदेशीर घरासंबंधी बोलताना म्हलारीमळ वाडय़ावर एकही बेकायदेशीर घर नसल्याची माहिती पंचसदस्य रमाकांत गावकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान दिव्यांग दाम्पत्यांनी सदर दाखला बनावट असून त्याची विश्वासहर्ता तपासावी अशी मागणी केली होती. मालकी हक्क असलेल्या आपल्या जागेतून तीन रस्ते बेकायदेशीरित्या पाडले असल्यामुळेच कुटूंबियांना बागायत व इतर शेती करणे शक्य नसल्याने सांगून कृषि खात्यामार्फत कुंपण उभारणीसाठीही हे रस्ते अडखळा बनत असल्याचे म्हटले होते.
मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार
पंचायतीने आमच्या जमिनीतून बेकायदेशीरित्या जाणाऱयांसाठी रस्ता उपलब्ध केल्याचा दावा दिव्यांगाच्यावतीने त्यांची मुलगी तारा गावकर यांनी केला आहे. सदर कुटूंबियांची परिस्थिती हलाखीची असून कायदेशीर लढाई लढण्यासाठीही परवडत नसल्याची व्यथा त्यांनी यावेळी मांडली होती. या घटनेची दखल घेत आरटीआय कायकर्ते तथा ज्येष्ठ नागरिकांसाठी झटणारे समाजसेवक राजन घाटे यांनी सहामुभुती व्यक्त केली होती. सरकार ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांची बाजू ऐकू न घेण्यास असमर्थ असल्यास सदर प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगून आझाद मैदान येथे धरणे धरणार असल्याचा ईशारा दिला होता.
आपल्या जागेतील तीन रस्ते हटवा
तीस वर्षापुर्वी सोमनाथ देवळापर्यंत जाण्यासाठी उभारलेल्या रस्त्यासाठी विरोध नसून, त्यानंतरही अजून तीन रस्ते पाडून आपल्या जमिनीचे तुकडे झालेले आहेत. या रस्त्यासाठी दिवसेंदिवस भांडणे व आपल्याच जमिनीसाठी लढा देणे सदर कुटूंबियांना शक्य नसून मुकबधीर दाम्पत्यांच्या जमिनीतून पाडलेले तीन रस्ते हटवून दिव्यांग दाम्पत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालावे अशी मागणी दिव्यांग कुटूंबियांनी आजच्या दिवशी केली आहे.









