ऑनलाईन टीम / बीजिंग :
लग्नासाठी मुली मिळत नसल्याने चीनमध्ये तीन कोटींहून अधिक पुरुष अविवाहित आहेत. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेतून हा धक्कादायक आकडा समोर आला असून, येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात येते.
चिनी परिवारात मुलाच्या जन्माला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुले आणि मुली यांच्या जननदरातील तफावत दीर्घकाळ कमी होण्याची शक्यता नाही. चीनमध्ये आजही मुलापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुलींशी विवाह केला जातो. त्यामुळे या वर्षात जन्माला आलेली मुले जेव्हा लग्नाच्या वयाची होतील तेव्हा त्यांना लग्नासाठी मुली मिळणे आजच्या प्रमाणेच अवघड होणार आहे.
राष्ट्रीय सांखिकी ब्युरोने जाहीर केलेल्या सातव्या जनगणना आकडेवारीनुसार गेल्या वषी चीनमध्ये 1.2 कोटी बालके जन्माला आली. त्यामध्ये मुले आणि मुली यांचे प्रमाण 111 मुलांमागे 100 मुली असे आहे. 2010 मध्ये हे प्रमाण 118 मुलांमागे 100 मुली असे होते. मुले आणि मुली संख्या फरक कमी होण्यास चीनला खूप वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात येते.