ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
हाँगकाँग आणि चीनमधील काही बंदरांवर भारतातून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सामानाचे कंटेनर अडवण्यात आले आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन FIEO ने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे.
चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंचे कंटेनर भारतातील बंदरावर कस्टम विभागाने अडवून ठेवल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्यानंतर चीनने लगेचच भारताच्या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सामानाचे कंटेनर अडवले आहेत.
खरे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून येणाऱ्या वस्तूंची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक असल्याने चीनमधून येणाऱ्या कन्साईनमेंटचे निर्जंतुकीकरण झाल्याशिवाय त्यांना देशात प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय भारतीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, चिनी अधिकाऱ्यांनी या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढत भारताच्या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.