संरक्षण दलांचे क्रौर्य- जीव वाचविण्यासाठी लोक गुहेत लपले
यांगून / वृत्तसंस्था
म्यानमारमध्ये सैन्याचे क्रौर्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शनिवारी एका अंत्ययात्रेवर बेछूट गोळीबार केल्याच्या दुसऱया दिवशी वायुदलाने सीमेला लागून असलेल्या एका गावात हवाई हल्ला केला आहे. यात मुलांसह अनेक जण जण मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात येत आहे. हे गाव म्यानमारच्या दक्षिणपूर्व करेन प्रांतात असून हल्ल्यांपासून वाचण्यासाठी लोकांनी नजीकच्या गुहांमध्ये आश्रय घेतला आहे.
सैन्याच्या हल्ल्यामुळे घाबरून येथील सुमारे 3 हजार लोक थायलंडमध्ये पलायन करण्यास हतबल ठरले आहेत. हा भाग बंडखोर गट करेन नॅशनल युनियनच्या (केएनयू) कब्जात असल्याचे मानण्यात येते. देशात वाढलेल्या हिंसाचारादरम्यान मध्य म्यानमारमध्ये पोहोचलेल्या शेकडो लोकांना आश्रय देत असल्याचे केएनयूचे म्हणणे आहे.
केएनयूनुसार वायुदलाने रविवारी रात्री 8 वाजता हल्ला केला आहे. केएनयूच्या ब्रिगेड-5 फोर्सच्या नियंत्रणातील भागात लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केली आहे. मागील महिन्यात सैन्याकडून सत्तापालट झाल्यावर गृहयुद्धाची भीती वाढल्याचे केएनयूचे म्हणणे आहे. पण याप्रकरणी म्यानमारच्या सैन्याकडून कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
2015 मध्ये शस्त्रसंधी
या भागात मागील काही वर्षांमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. केएनयूने 2015 मध्ये सरकारसोबत शस्त्रसंधी केली होती. ब्रिगेड-5 फोर्सेसने सैन्याच्या एका तळावर हल्ला केला असून यात लेफ्टनंट कर्नलसह 10 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे केएनयूने शनिवारी सांगितले होते. त्याचदिवशी म्यानमारच्या सैन्याने राजधानी ने पी तॉमध्ये सशस्त्र दल दिन साजरा केला होता.
निदर्शक मृत्युमुखी
म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान सुरक्षा दल आणि निदर्शक यांच्या संघर्षात 114 जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी 44 शहरांमध्ये निदर्शने आणि 114 जण मारले गेल्याचे म्हटले गेले होते. प्रसारमाध्यमे आणि इंटरनेटवर बंदीमुळे बळींचा खरा आकडा समजणे अशक्य ठरले आहे.
12 देशांकडून टीका
12 देशांच्या संरक्षणप्रमुखांनी म्यानमारच्या सैन्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इटली, डेन्मार्क, ग्रीस, नेदरलँड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण केरिया आणि जपान सामील आहे. एका संयुक्त वक्तव्यात म्यानमारचे सैन्य आणि सुरक्षा दलांकडून निःशस्त्र लोकांवर होत असलेल्या बळाच्या वापराची निंदा करत असल्याचे म्हटले गेले आहे. हिंसा रोखणे आणि म्यानमारमध्ये सन्मान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काम करण्याचे आवाहन सैन्याला करण्यात आले आहे. प्रोफेशनल आर्मी आंतरराष्ट्रीय मापदंडांचे पालन करते आणि लोकांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असते असेही 12 देशांच्या संरक्षण प्रमुखांकडून नमूद करण्यात आले आहे.









