घटनास्थळी मदत व बचावकार्याला वेग
यांगोन / वृत्तसंस्था
म्यानमारमध्ये खाण कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत सुमारे 70 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली. दुर्घटनेनंतर बचाव पथकाचे 200 जवान घटनास्थळी पोहोचले असून भूस्खलनप्रवण भागात मदत आणि बचाव पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. काचिन राज्यातील हापाकांत भागात बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाल्याची माहिती बचाव पथकातील एका अधिकाऱयाने दिली. हापाकांत परिसर हे म्यानमारच्या जेड उद्योगाचे केंद्र आहे.
भूस्खलन दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खाणीत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, अद्याप जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. जवळच्या तलावात बोटींचा वापर करून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात होता. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे.
हापाकांत येथे खराब नियमन केलेल्या खाणींमध्ये प्राणघातक भूस्खलन आणि इतर अपघात होणे ही सामान्य बाब झाली आहे. गेल्या आठवडय़ातही भूस्खलनात सहा जणांचा मृत्यू झाला होता. येथील खाणींमध्ये मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित मजूर काम करतात. गेल्यावषी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काचिन राज्यात खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला होता.









