30 जणांची हत्या करून मृतदेह जाळले
वृत्तसंस्था/ यंगून
म्यानमारच्या काया राज्यात महिला आणि मुलांसह 30 हून अधिक लोकांचे जळालेले मृतदेह मिळाले आहेत. एका स्थानिक मानवाधिकार गटाने यासंबंधी माहिती दिली आहे. शनिवारी म्यानमारच्या हप्रुसो शहराच्या मो-सो गावानजीक सैन्याने या लोकांना ठार केल्याचा दावा करेनी ह्युमन राइट्स ग्रूपने केला आहे. तर शस्त्रसज्ज दहशतवाद्यांच्या एका गटाला ठार केल्याचे सैन्याचे म्हणणे आहे.
गावात उग्रवादी गटाच्या शस्त्रसज्ज दहशतवाद्यांना मारल्याचे म्यानमारच्या सैन्याकडून सांगण्यात आले. सैन्यानुसार हे सर्व जण 7 वाहनांमधून प्रवास करत होते आणि सैन्याने रोखल्यावरही ते थांबले नाहीत. याचमुळे या वाहनांवर गोळीबार करण्यात आला.
शुक्रवारी रात्री या घटनेविषयी समजले, परंतु गोळीबारामुळे तेथे जाऊ शकलो नाही. शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहोचल्यावर तेथे जळालेले मृतदेह पडले होते. याचबरोबर मुलांचे आणि महिलांचे कपडे विखुरलेले होते असे एका ग्रामस्थाने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले आहे. या घटनेत 30 हून अधिक लोक मारले गेल्याचा संशय असून यात लहान मुले आणि महिला देखील सामील आहेत.
म्यानमारमध्ये फेब्रुवारी महिन्यात आंग सान सू की यांच्या सरकारला हटवून सैन्याने सत्ता स्वतःच्या हाती घेतली होती. तेव्हापासून देशात अशांततेचे वातावरण आहे. जागतिक समुदाय म्यानमारमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी करत आहे. म्यानमारमध्ये सैन्य राजवटीच्या विरोधात लोकशाहीसमर्थक सातत्याने निदर्शने करत आहेत. परंतु सैन्याकडून त्यांचा हा आवाज दडपला जातोय.









