श्रीकृष्णाची स्तुती केल्यानंतर भगवान महादेवांनी काय विनंती केली पहा. –
श्रीकृष्णा हा बाणासुर । माझा इष्ट प्रियतम फार ।
प्रणत मद्भजनीं सादर । केवळ अनुचर मन्न ।
ऐसियातें सर्वांपरी । अभय दिधलें म्यां श्रीहरि ।
तूंही तेंचि यथार्थ करिं । प्रसाद मजवरी करूनियां ।
तुझिया प्रसादाचें पात्र । जाणोनि हा बाणासुर ।
प्रसन्न होवोनि माझा वर । करिं साचार प्राग्दत्त ।
माझिया प्रसादा भाजन । तूं जरी म्हणसी कैसा बाण। यदर्थीं पूर्वपरिज्ञान । देतों स्मरण करूनियां ।
प्रह्राद तुझा अनन्य भक्त । त्याच्या ठायें तव प्रसाद नित्य । बाण त्याचाचि प्रपौत्र सत्य । जाणोनि स्वाङ्कित कृपा करिं । प्रह्रादाच्या ठायीं जैसा । तुझा प्रसाद द्वारकाधीशा । बाणावरीही करिं तैसा। जाणोनि स्वदासांमाजि आपुल्या । म्यां बाणातें दिधलें अभय । तें संरक्षी कृपाळु होय ।
ऐसें प्रार्थितां गिरिजाप्रिय । श्रीकृष्ण काय बोलतसे ।
भगवान महादेवांनी श्रीकृष्णाला विनंती केली – हे देवा ! हा बाणासुर माझा परमप्रिय, कृपेला पात्र झालेला सेवक आहे. मी याला अभय दिले आहे. प्रभो ! याचे पणजोबा प्रल्हाद याच्यावर आपली जशी कृपा आहे, तशीच कृपा याच्यावरही असावी.
भो भगवन्ता उमापति ।
त्वां जें प्रार्थिलें आम्हांप्रति ।
तें तव प्रिय सुनिश्चिती ।
आम्हां सर्वार्थीं करणीय ।
त्वां जें निश्चयें प्रतिपादिलें ।
आणि आम्हांतें अनुमोदिलें ।
तें सर्वार्थीं साधु भलें ।
मान्य केलें पैं आम्हीं ।
बाणासुराच्या रक्षणोद्देशें ।
आम्हां स्तविलें त्वां संतोषें।
तें म्यां मान्य केलें असे ।
समरावेशें या न मारिं । आणिकही एक्मया गुणें । बाणासुरा म्यां वांचवणें । तेंही कथितों तुजकारणें । सावध श्रवणें अवधारिं ।
श्रीकृष्ण भगवान महादेवाला म्हणाले- भगवन! आपण आम्हाला जे सांगितले, त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असणारे मी करीन. याच्यासाठी आपण पूर्वी जे ठरवले होते त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडले आहेत.
हा मारावया योग्य नव्हे। काय म्हणोनि पुससी जरी हें । तरी वैरोचनि जो असुरवर्य। त्याचा तनय औरस हा । आणि प्रह्रादासि म्यां दिधला वर। तुझे वंशींचा न मारिं असुर। तस्मात् अवध्य बाणासुर। मजपासूनि हा निर्धारें । तुझिया स्तवनें तोषलों भारी। तव प्रार्थना अङ्गीकारिं । विशेष हा मद्भक्तान्वयधारी। न मारिं समरिं मी यातें । जरी तूं म्हणसी तरी कां पहिलें। याचें सैन्य संहारिलें। बाणबाहूंचें खंडन केलें । तेंही वहिलें अवधारिं ।
भगवान महादेवांची बाणासुराला अभय देण्याची विनंती श्रीकृष्णाने मान्य केली. श्रीकृष्ण भगवान शंकराला पुढे म्हणाले-बाणासुर बलीचा पुत्र आहे, म्हणून मी याचा वध करू शकत नाही. कारण प्रल्हादाला वर दिला आहे की, तुझ्या वंशातील कोणाचाही मी वध करणार नाही.
Ad. देवदत्त परुळेकर








