निजामुद्दीन मरकजमधून तबलिगी जमातच्या लोकांना बाहेर काढल्यावर तेथे सर्वांना जमविणारा मौलाना साद कुठे आहे हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. परंतु मौलाना सादचा ठावठिकाणा आता सापडला आहे. निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद कांधलवी दक्षिण पूर्व दिल्लीत स्वतःच्या एका सहकाऱयाच्या घरात क्वारेंटाईनमध्ये आहेत. सरकारने अनुमती नाकारूनही साद यांनी तबलिगी जमातचा कार्यक्रम आयोजित केल्याने कोरोनाचा देशातील अनेक भागांमध्ये फैलाव झाला आहे.
मौलाना साद बहुतांश वेळ मरकज किंवा कांधला येथील स्वतःच्या मूळ घरात वास्तव्यास असतात. मरकज प्रमुख यापूर्वी देखील तबलिगी जमातच्या विभाजनामुळे वादात सापडले आहेत. मरकजने पोलीस अधिकाऱयांना पूर्ण सहकार्य केले आहे. मरकजकडून भविष्यातही संबंधित चौकशीत पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचा दावा मरकजचे मुख्य वकील फुजैल अहमद अयूबी यांनी केला आहे.
मरकजच्या कार्यक्रमात सामील शेकडो जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सरकारने विविध राज्यांमध्ये जमातच्या किमान 25 हजार सदस्यांना क्वारेंटाईनमध्ये ठेवले आहे. जमातच्या कार्यक्रमात सामील झालेले तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा अद्याप शोध घेतला जातोय.









