पुलाची शिरोली/ वार्ताहर
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील सचिन रामचंद्र कुलकर्णी ( वय ४१ ) या तरुणाचा विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यु झाला. आज सकाळी आठच्या सुमारास मौजे वडगाव येथे सचिनच्या दारातच ही दुर्घटना घडली.
घटनास्थळी मिळालेली माहीती अशी , सचिन चावीला पाणी आले म्हणुन विद्युतमोटर जोडत होता. दरम्यान अचानक बसलेल्या वीजेच्या धक्क्याने सचिन कपाळावर जोरात आदळला. तेथेच तो दहा मिनीटे पडून राहीला. गल्लीतील सर्वजण पाणी भरण्यात व्यस्त असल्याने कुणाचेही या घटनेकडे लक्ष नव्हते. दहा मिनिटे झाली तरी सचिन अजुन घरात का आला नाही म्हणून त्याची आई घराबाहेर अंगणात आली. त्यांनी सचिनला पाण्याच्या चावी जवळ निपचीप पडलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा सूरू केला. यामुळे शेजारील लोक जमा झाले. त्यातील एकाने विजेचा प्रवास खंडीत केला. घटनेची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर सचीनला कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.
सचिन हा कष्टाळू व हुशार होता. आई – वडिलांचा तो एकुलता आधार होता. त्याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई, वडील, विवाहीत बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी ( ता. ११ ) सकाळी नऊ वाजता आहे. यापूर्वी मौजे वडगाव येथे अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. सन २००७ मध्ये १९ वर्षीय महिला, २०११ मध्ये २४ वर्षीय महिला, २०१६ मध्ये १६ वर्षाचा मुलगा व आता सचिन अशा पध्दतीने सुमारे चार जणांनी आपला जीव गमावला आहे.









