कॅम्प पोलिसांची कारवाई, पाच दुचाकी जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
उज्वलनगर येथील एका युवकाला अटक करुन 5 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कॅम्प पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली असून त्याने आणखी कोठे चोरी केली आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे.
सैफील कासीम तहसीलदार (वय 35, रा. उज्वलनगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, एसीपी अरुणकुमार कोळुर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पुजारी, श्रीधर तळवार, संतोष बरगी, भरमप्पा सरवी, आर. बी. मदिहळ्ळी, एस. आर. कोटे, भरमा करेगार, मोहन अरळगुंडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी निपाणी येथे चोरलेल्या एका अॅक्टीव्हावर बनावट नंबर प्लेट लावून तो फिरत होता. पोलिसांनी त्याला अडवून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता सैफीलजवळ आढळलेली दुचाकी चोरी प्रकरणातील असल्याचे उघडकीस आले. त्याच्याजवळून 1 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.









