प्रतिनिधी /सातारा
शिखर शिंगणापूर मोही ता माण येथील जुगार अड्ड्यावर शिंगणापूर पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मोही गावात जुगारअड्डा सुरू असल्याची खबर दहिवडी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित यांच्यासह अमोल चांगण, सागर अभंग, आर एस बनसोडे, एस ए चव्हाण यांच्या पोलीस पथकाने मोही येथे छापा टाकला
या वेळी बेलदारवस्ती भागातील पाण्याच्या टाकीखाली काहीजण तीन पानी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मौलाली मुल्ला मुसाभाई (रा शिंगणापूर), विजय शिवजी जाधव, अर्जुन पांडुरंग चव्हाण, धनाजी बाबा देवकर, रामचंद्र संपत देवकर, विश्वनाथ गणपत देवकर (सर्वजण रा.मोही) या सहाजणांना रंगेत हात पकडून ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडील 2चारचाकी, चार मोटारसायकल, मोबाईल तसेच रोख रक्कम असा 2 लाख 22 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल चांगण करीत आहेत.