क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
सामन्याच्या जादा वेळेत बेंगलोर युनायटेडचा 4-2 गोलानी पराभव करून कोलकाताच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने 130व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. कोलकाताच्या सॉल लेक स्टेडियमवर खेळविण्यात आलेला हा सामना पूर्ण वेळेत 2-2 असा बरोबरीत संपला होता. त्यानंतर जादा वेळेतील खेळात मोहम्मेडन स्पोर्टिंगने आणखी दोन गोल केले.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला पेद्रू झेवियर मांझीने गोल करून बेंगलोर युनायटेडला आघाडीवर नेले होते. मात्र त्यांची ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. नवव्याच मिनिटाला मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या मार्पुस जोसेफने गोल करून बरोबरी गाठली. त्यानंतर फैझल अलीने 38व्या मिनिटाला गोल करून मोहम्मेडन स्पोर्टिंगला आघाडी घेऊन दिली.
दुसऱया सत्रातील 78व्या मिनिटाला बेंगलोर युनायटेडच्या कुनशूक देबनाथने गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. सामना जादा वेळेत गेल्यानंतर 102व्या मिनिटाला मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या ब्रँडन वानलालरेमडिकाने गोल करून परत एकदा 3-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 110व्या मिनिटाला निकोला स्टॉजानोवीचने पेनल्टीवर मोहम्मेडन स्पोर्टिंगचा चौथा गोल करून विजय सोपा केला. आता 29 रोजी एफसी गोवा आणि बेंगलोर एफसी यांच्यात दुसरी उपान्तय लढत होणार आहे.









