आशिया चषक सुपर फोर लढत : पाकच्या 42 षटकांत 7 बाद 252 धावा, इफ्तिखारची फटकेबाजी, पथिरानाचे 3 बळी
वृत्तसंस्था /कोलंबो
अब्दुल्ला शफिक व मोहम्मद रिझवान यांच्या शानदार अर्धशतकांमुळे पाकने लंकेविरुद्धच्या आशिया चषक सुपर फोरमधील महत्त्वाच्या सामन्यात 42 षटकांत 7 बाद 252 धावा जमविल्या. डकवर्थ-लेविस-स्टर्न यांच्या नियमानुसार लंकेला 252 धावांचेच आव्हान मिळाले आहे. प्रारंभी पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. त्यानंतर 28 व्या षटकात पावसास पुन्हा प्रारंभ झाल्याने खेळ थांबवण्यात आला होता. हा सामना प्रथम 45 आणि नंतर 42 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला गेला. पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर निर्धारित 42 षटकांत 7 बाद 252 धावा जमविल्या. शफिकचे अर्धशतक, रिझवानची जलद खेळी आणि इफ्तिखार अहमद व बाबर आझम यांचे उपयुक्त योगदान मोलाचे ठरले.
पाक व लंका यांचे प्रत्येकी 2 गुण झाले असल्याने हा सामना जो जिंकेल तो अंतिम फेरीत रविवारी भारताविरुद्ध खेळणार आहे. शफिकने 69 चेंडूत 52 धावा जमविल्या तर रिझवानने 73 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. याशिवाय इफ्तिखारनेही जलद धावा करताना 40 चेंडूत 47 धावा फटकावल्या. फखर झमान (4) लवकर बाद झाल्यानंतर बाबर व शफिक यांनी 11 षटकांत 64 धावांची भागीदारी केली. दुनिथ वेलालगेने ही जोडी फोडताना बाबरला यष्टिचीत केले. ऑफस्टंपबाहेर पडलेला चेंडू आत वळल्याने बाबर फसला आणि कुसल मेंडिसने त्याला चपळतेने यष्टिचीत केले. बाबरने 35 चेंडूत 29 धावा काढल्या. तो बाद झाल्यानंतर 6 षटकांत त्यांचे आणखी तीन गडी 30 धावांची भर घालत बाद झाले. 5 बाद 130 अशी त्यांची स्थिती झाली असताना रिझवान व इफ्तिखार यांनी लंकेचे मनसुबे उधळून लावत आक्रमक फटकेबाजी करून सहाव्या गड्यासाठी 108 धावांची भागीदारी केली. त्यांच्या फटकेबाजीमुळे पाकला शेवटच्या 10 षटकांत 102 धावा काढता आल्या. इफ्तिखारला पथिरानाने बाद केले तर रिझवान नाबाद राहिला. त्याने 73 चेंडूच्या खेळीत 6 चौकार, 2 षटकार मारले तर इफ्तिखारने आपल्या खेळीत 4 चौकार, 2 षटकार मारले. लंकेच्या पथिरानाने 65 धावांत 3 बळी मिळविले. प्रमोद मदुशनने 2 व थीक्षना, वेलालगे यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : पाक 42 षटकांत 7 बाद 252 : शफिक 69 चेंडूत 52, फखर झमाना 4, बाबर आझम 35 चेंडूत 29, रिझवान 73 चेंडूत नाबाद 86, मोहम्मद हॅरिस 3, नवाझ 12, इफ्तिखार 40 चेंडूत 47, शदाब खान 3, शाहीन आफ्रिदी नाबाद 1, अवांतर 15. गोलंदाजी : पथिराना 3-65, मदुशन 2-58, थीक्षना 1-42, वेलालगे 1-40.









