वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय फुटबॉल प्रशिक्षक, फुटबॉलपटू आणि साहाय्यक प्रशिक्षक यांचे थकित मानधन सोमवारी मोहन बगान फुटबॉल क्लबने अदा केले आहे, अशी माहिती क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
फुटबॉल प्रशिक्षक, फुटबॉलपटू आणि साहाय्यक प्रशिक्षक कर्मचाऱयांचे मानधन देणे बाकी होते. पण मंगळवारी 7 रोजी ते सर्व थकित मानधन देण्यात आल्याचा खुलासा मोहन बगान फुटबॉल क्लबने केला आहे. कोरोना महामारी संकटामुळे फुटबॉलपटूंचे तसेच प्रशिक्षकांचे मानधन थकले होते. पण आम्ही त्यांना यापूर्वीच सर्व थकित रक्कम देण्याची ग्वाही दिली होती. भविष्यकाळामध्ये फुटबॉलपटू, प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षक वर्ग नेहमीच मोहन बागानला सहकार्य करेल, अशी आशा क्लबच्या व्यवस्थापकांनी केली आहे.
कोरोना संकटामुळे आय लिग फुटबॉल स्पर्धा अर्धवट स्थितीमध्ये स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील चार फेऱयातील सामने होऊ शकले नाहीत पण गुणतक्त्यातील आघाडीमुळे मोहन बगान संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेतील विजेता एटीके क्लबचे मोहन बगानमध्ये विलीनीकरण झाले आहे. आता यापुढे या संघाचे बगान-एटीके असे नवे नामकरण राहिल. मोहन बगान संघाला 131 वर्षांचा इतिहास असून हा भारतीय फुटबॉल क्षेत्रातील सर्वात जुना फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जातो.









