– अक्षता नाईक
भावभक्तीचा गुलाल उधळून । तोरण लावा दारी ।।
हासत नाचत येई । गणरायाची स्वारी ।।
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून राजू मोहिते आपल्या सहकाऱयांसोबत करीत आहेत. कोणत्याही साच्याचा वापर न करता प्रत्येक मूर्तीच्या चेहऱयावर असलेला भाव व इतर रेखीवता केवळ हाताच्या बोटावर साकारण्याची कला त्यांना अवगत आहे.
शाडूपासून बनविलेली रेखीव मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे. साधारण दीड ते दोन फूट उंचीच्या इको प्रेंडली गणेश मूर्तीला दरवर्षी मागणी वाढत आहे. दरवर्षी 30 ते 40 गणपतीची मागणी असते. पण यावषी मोहिते बंधूंनी जादा गणेश मूर्ती बनविल्या.
सुंदर, रेखीव, सुबक, देखणी व आकर्षक गणेश मूर्ती बनवत वेगळेपण जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दरवषी वेगवेगळय़ा स्वरुपात भक्तांच्या मनातील गणरायाला आकार देण्याचा प्रयत्न ते आपल्या हातातून साकारतात. प्रत्येक मूर्तीमध्ये नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे दरवषी त्यांच्या मूर्तींना मागणी वाढतच आहे. तसेच पुढील वर्षी कल्पकतेच्या जोरावर मूर्तीकलेत प्रगती करण्याचा त्यांचा मानस आहे.
कुमारस्वामी लेआउट सेकंड मेन थर्ड क्रॉस या आपल्या निवासस्थानी असलेल्या मूर्तीशाळेत मातीला दैवत्व प्राप्त करून देत आहे. यावषी त्यांनी स्वकल्पकतेने अनेक मूर्ती बनविल्या. यात एक विशिष्ट मूर्ती आहे ती म्हणजे कागदी नाव पावसाच्या पाण्यात सोडून बागडणारा बालगणेश, उंदरांसोबत बागडणारा बाल गणेश, गोरा कुंभार रुपातील बाल गणेश यासह अनेक मूर्ती बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्याला ही प्रेरणा मूर्तिकार विशाल शिंदे यांच्याकडून मिळाली असल्याचा उल्लेख ते आवर्जून करतात.
दरवर्षी मूर्तीमध्ये वेगळेपण आणि नाविन्य जपण्याचा प्रयत्न मोहिते बंधू करीत आहेत. गणराय त्यांच्या हातांना अशीच नाविन्यता साधण्याची सर्जनशीलता देवो, हीच गणरायचरणी प्रार्थना…!
एक मूर्ती बनविण्यास 3-5 दिवस लागतात : प्रदीप मोहिते
कोणतीही मूर्ती तयार करण्यापूर्वी त्या मूर्तीची बैठक आम्ही मनात ठरवतो. मूर्तीचे हात, पोट, पाय, मुख याबद्दल अभ्यास करूनच मूर्ती कशाप्रकारे दिसेल, त्यामध्ये आणखी कोणते बदल करता येऊ शकतात का, याचा सर्व विचार करूनच आम्ही मूर्ती बनवतो. एक मूर्ती बनविण्यासाठी तीन ते पाच दिवस लागतात. अजूनही आम्हाला मूर्ती बनविण्याच्या कौशल्यात खूप काही शिकून प्रगती करावयाची आहे. पण आम्ही बनविलेल्या मूर्ती आजही बेळगावच्या भाविकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
साच्याचा वापर न करता बनविल्या मूर्ती : राजू मोहिते
कोणत्याही यंत्राचा किंवा साच्याचा वापर न करता फक्त हातानेच मूर्ती बनवितो. त्यामुळे अशा इकोप्रेंडली मूर्तींना मागणी वाढली आहे. बेळगावमध्ये मूर्तीकलेत काहीतरी नाविन्यपूर्ण असावे, असे वाटल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून हे काम करत आहे. यंदा कोरोनामुळे उशिरा ऑर्डरी आल्या तरी दर वषीपेक्षा या वषी जादा वीस मूर्ती बनविल्या आहेत.









