लॉकडाऊन असूनही नेहमीपेक्षाही अधिक वाहने : मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : अतिरिक्त व उपजिल्हाधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी / धारबांदोडा

मोले चेक नाक्यावरून अनमोड घाटमार्गे गोव्यात येणारी वाहने दुकळे व बोंदूमळ येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला रात्रीच्या वेळी पार्क करून ठेवली जातात. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारे हे ट्रकचालक व क्लीनर टाळेबंदीचे नियम धाब्यावर बसवत मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता मोले बाजारात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊनपूर्वीच्या वाहनांपेक्षाही अधिक प्रमाणात वाहने आता लॉकडाऊन असतानाही कशी येतात, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त करुन सरकारी यंत्रणांनी परराज्यातील या वाहनांवर तसेच वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी मोले ग्रामस्थांनी केली आहे.
त्यासंबंधीचे लेखी निवेदन ग्रामस्थांतर्फे पंचायतीला व मोले पंचायतीकडून धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात आले आहे. लॉकडाऊनपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरून कमी प्रमाणात वाहतूक होत होती. मात्र लॉकडाऊन लागू झाल्यापासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. हा विरोधाभास पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सरपंच, पंच, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त
मंगळवारी रात्री 11 वा. मोठय़ा प्रमाणात वाहने मोले महामार्गाच्या बाजूला उभी करून ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक युवकांनी संताप व्यक्त केला. वाहने पार्क करून चालक व क्लीनर टाळेबंदीचे कोणतेच नियम न पाळता मोले बाजारात फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी त्याला हरकत घेतली. यावेळी मोले पंचायतीच्या सरपंच स्नेहलता नाईक, पंचसदस्य समर कदम, रामकृष्ण गांवकर व कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच मनीष लांबोर यांनी भेट देऊन पाहणी केली व एकंदरीत प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
ट्रकचालक, क्लीनर फिरतात बाजारात
मोले परिसरातील लोक टाळेबंदीच्या आदेशाचे पालन करीत आहेत. मात्र चेक नाक्यावरून येणाऱया परराज्यातील वाहनांचे चालक योग्य ती खबरदारी घेत नाहीत. मोले बाजारात फिरताना फेसमास्क वापरत नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण असून संबंधित यंत्रणेने योग्य ती दखल न घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वाहनचालक, क्लीनरची कसून चौकशी व्हावी ः सरपंच
दिवसाकाठी शेकडो वाहने मोले चेक नाक्यावरून ये-जा करीत असून चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. एका ट्रकवर परराज्यातून आलेले चालक व क्लिनर माल खाली करुन परत जातात की, नाही याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे, असे कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच मनीष लांबोर म्हणाले. सध्या लोकांमध्ये भितीचे वातावरण असून यामार्गे होणारी वाहतूक बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वाहतुकीबाबत संशय घेण्यास वाव : खांडेपारकर
निवृत्त मुख्याध्यापक शरदचंद्र खांडेपारकर म्हणाले, वास्तविक टाळेबंदीनंतर येथील वाहतूक मर्यादित होणे अपेक्षित होते. उलट ती वाढली आहे. अत्यावश्यक सामान घेऊन येणाऱया वाहनांना येथे परवानगी आहे. मात्र अत्यावश्यक सामान घेऊन येणाऱया वाहनापेक्षा इतर वाहनेच जास्त येतात. त्यात खनिज वाहतूक करणाऱया वाहनांचाही समावेश आहे. त्यामुळे काही तरी गडबड असल्याचा संशय घेण्यास बराच वाव असल्याचे ते म्हणाले.
अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांची चेकनाक्याला भेट
दरम्यान मोले चेक नाक्यावरून होणाऱया वाहतुकीस स्थानिकांचा विरोध होत असल्याचे लक्षात येताच बुधवारी सकाळी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद खुटकर, धारबांदोडा उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार अभिर हेदे, संयुक्त मामलेदार शर्मिला गांवकर यांनी मोले चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी मोलेच्या सरपंच स्नेहलता नाईक, उपसरपंच सुशांत भगत, पंचसदस्य रामकृष्ण गांवकर, समर कदम, निवृत्त मुख्याध्यापक शरदचंद्र खांडेपारकर उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक म्हणाले, मोले परिसरात जी वाहने पार्क करून ठेवली जातात त्या वाहनातील चालक किंवा क्लिनरला वाहनातून खाली उतरू देऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









