सिद्धार्थ कुंकळकर यांचे मत
प्रतिनिधी / पणजी
मोले क्षेत्रातील तीन्ही प्रकल्प जुनेच आणि महत्त्वाचे असून ते होणे गोव्याच्या हिताच्या असल्याचा दावा पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी केले आहे. गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने ते प्रकल्प झाले पाहिजेत आणि पुढील पिढीसाठी तर ते आवश्यक आहेत, असेही ते म्हणाले.
काहीजण गरज नसताना त्या प्रकल्पांना विरोध करीत असून त्यांनी सकारात्मक बाजू तपासून बघावी, असेही श्री. कुंकळकर यांनी नमूद केले. विरोधी पक्ष तर सरकारला सहकार्य न करता विरोधासाठी विरोध करत असल्याचे भाजपचे प्रवक्ते सत्यविजय नाईक यांनी सांगितले
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कुंकळकर व श्री. नाईक बोलत होते. रेल्वे दुपदरीकरण, 400 किवी वीज वाहिनी व रस्ता रुंदीकरण हे तिन्ही प्रकल्प मोले भागात होऊ घातले असून ते नवीन प्रकल्प नाहीत तर जुनेच आहेत फक्त त्यांचा विस्तार करण्यात येत असून वाढती मागणी व पुढील 50 वर्षांचा हिशोब करूनच ते प्रकल्प आखण्यात आले आहेत. नुकसान फायदा यांचा कुठेतरी ताळमेळ घालून समतोल साधून ते प्रकल्प झाले पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला.
विरोधक त्या प्रकल्पांना आडकाठी आणून ‘खो’ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ते जनतेची दिशाभूल करून त्यांना प्रकल्पाविरोधात विनाकारण भडकवत आहेत. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून पर्यावरण अभ्यास अहवाल घेऊनच ते पुढे नेले जात आहेत. त्याचा विरोधकांनी तसेच जनतेने सकारात्मक विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार योग्य मार्गाने काम करीत असून त्यांना साथ देण्याचे सोडून विरोधक कुरापती काढत असल्याचा आरोप श्री. नाईक यांनी यावेळी केला. सरकार चांगले काम करत असून कोरोनाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे म्हादईचा विषय महत्त्वाचा असून गोव्याची बाजू विचारात घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.









