गवस कुटुंबाची भंबेरी, ग्रामस्थही भयभीत
वार्ताहर / दोडामार्ग:
गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या रानटी टस्कर हत्तीचे मोर्ले गावातील एका घराच्या अंगणात आगमन झाले. पहाटेच्या सुमारास आलेल्या या हत्तीमुळे संबंधित घरमालकासह ग्रामस्थांची झोप उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी मोर्ले गावात वन अधिकारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यावेळी मोर्लेतील ग्रामस्थांनी हत्तींचा कसा वावर आहे. तसेच संपूर्ण गाव व तिलारी परिसर या रानटी हत्तींच्या दहशतीखाली कसा आहे, याची माहिती दिली होती. तर आमदार नाईक व अन्य पदाधिकाऱयांनी तिलारी खोऱयात अभयारण्य नको, तर हत्ती पकडा, अशी भूमिका त्यावेळी मांडली होती. ही बैठक होऊन काही तास उलटत नाही तोच मोर्ले गावातील वासुदेव शंकर गवस यांच्या घरी हत्तीने धडक दिली. सोमवारी पहाटे 3.45 च्या सुमारास घराबाहेरील अंगणातून येणारा आवाज ऐकून गवस व त्यांचे कुटुंबीय बाहेर आले असता त्यांना टस्कराचे दर्शन झाले. त्यांनी कसेबसे या हत्तीला पिटाळून लावले. हत्तीच्या पाऊलखुणा गवस यांच्या अंगणात उमटल्या. हत्तीला पिटाळून लावण्यात गवस कुटुंबियांना यश आले तरी गवस कुटुंबीय दहशतीखाली आहे. टस्कर हत्ती येऊन गेल्याची बातमी गावात पसरताच ग्रामस्थ भयभीत झाले. त्याचबरोबर मोर्ले गावानजीकच्या अन्य सर्व गावांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने निदान आता तरी गांभीर्याने या समस्येकडे पाहावे, अशी मागणी मोर्ले तसेच अन्य गावांनी केली आहे.









