नवरात्र संपले. दसरा उजाडला. मोरूच्या बापाला लवकर जाग आली. दर वषी या वेळी दसरा पहाट वगैरे कार्यक्रमांसाठी नटून थटून जाणारी अर्धांगी यंदा कोरोनामुळे कुठेच गेली नव्हती. पण ती लवकर उठली होती आणि काल व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या मोरपंखी साडीतल्या स्वतःच्या फोटोचे मैत्रिणींनी केलेले कौतुक वाचत होती. त्यामुळे पिताश्रींनी आत्मनिर्भर होत स्वतः स्वयंपाकघरात जाऊन चहा केला. चहाचे कप भरले. एक अर्धांगीला दिला आणि दोन कप घेऊन मोरूच्या खोलीत गेले. मोरूला आधी दोन हाका मारल्या. मग गदगदा हलवले. पण तो ढिम्म. खाली वाकून वास घेतला. मोरूने घेतलेली नव्हती. सिनेमाचा छांदिष्ट असलेला आपला सुपुत्र ड्रग वगैरे घेतो की काय अशी शंका आली. पण त्या कोणत्याशा नटीने फक्त सिनेमातल्या कलाकारांवरच आरोप केलेत, प्रेक्षकांवर नाहीत. त्याअर्थी मोरू ड्रग घेत नाही. मग त्यांनी आपल्या मोबाईलवरून मोरूला एक मेसेज धाडला, “मोरू, नवरात्र संपले. दसरा ऊजाडला. झोपेतुन जागा हो. चहा पि. स्नान करुन पवीत्र हो.’’
मोबाईलच्या नोटीफिकेशनचा आवाज ऐकून मोरू उठला. त्याने तीर्थरूपांचा संदेश वाचला. मग तो त्यांच्या हातातून चहाचा कप घेत वसकन ओरडला, “बाबा, मान्य आहे की तुम्ही चाळीस वर्षांपूर्वी आईशी लग्न केलं. भाऊंनी पक्षाची करावी तशी संसाराची बांधणी केली. पण म्हणून मला मेसेज पाठवताना ऱहस्वदीर्घच्या इतक्मया चुका? हा मेसेज आहे की राजीनाम्याचे पत्र?’’
“मोरबा, राजीनाम्याचे पत्र असो की मोबाईलवरचा मेसेज असो. भावना समजल्याशी कारण. आपण सामान्य माणसं. आपला व्याकरणाशी काय संबंध?’’
मोरूने यावर उत्तर न देता शांतपणे चहा संपवला. मग म्हणाला, “टपरीवर जाऊन येतो.’’ आणि कपडे करून निघाला. पण त्याने मास्क लावला नव्हता.
“मोरू, मास्क विसरलास काय?’’
“विसरलो नाही. पण मास्क कशाला हवा? बाबा, विरोधी पक्ष नेते सतत सरकारविरुद्ध तक्रारी करतायत. आज ना उद्या राज्यपाल आपलं सरकार बरखास्त करतील. मग निवडणुका येतील. मग नेते आपल्यालाही कोरोनाची मोफत लस देऊ करतील.’’
“खुळा की काय तू? अजून लस तयारच झालेली नाही. आणि नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवतात का कधी? चल, लाव तो मास्क.’’
मोरूने मास्क लावला आणि बाहेर पडला.








