सरपंच व अन्य सदस्यांचाही पाठिंबा
प्रतिनिधी / ओरोस:
कोचरे गावातील बीएसएनएल टॉवरचे मागील दोन वर्षापासून रखडलेले काम तात्काळ मार्गी लावण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायत सदस्य योगेश तेली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोचरा सरपंच व अन्य सदस्य यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
गावातील नेटवर्क सुविधा सुरळीत करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला होता. यासाठी आपण जागाही उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर 2018 साली या टॉवरच्या उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, हे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. त्यामुळे नेटवर्कचा मोठा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे.
मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोचरा ग्रामपंचायतीमधून अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, काही दिवसात काम चालू होईल, अशी उत्तरे बीएसएनएल प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचे कारण पुढे करत चालढकल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावात बीएसएनएल सुविधा नसल्याने आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे, रास्त दराच्या धान्य दुकानावर डिजिटल प्रणालीने धान्य मिळविणे, डॉक्टरांशी संपर्क साधणे, तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली ऑनलाईन शिक्षण प्रणाली व शासकीय कार्यालयातून मिळणारे दाखले यासारख्या बाबी वेळेवर उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत असून त्यांच्या रोषाला स्थानिक लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, बीएसएनएल टॉवर उभारणीचे हे रेंगाळलेले काम मार्गी लागण्यात जिल्हाधिकाऱयांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बीएसएनएल प्रबंधकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिल्याने सायंकाळी उशिरा उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती योगेश तेली यांनी दिली.









