शिरोळ / प्रतिनिधी
मोबाईल चोरी प्रकरणातील सराईत गुन्ह्यातील संशयित चोरट्यास पकडण्यात शिरोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या चोरट्यांकडून शिरोळ पोलीस ठाणे व शिरोली पोलीस ठाण्यात हद्दीतील प्रत्येकी 1 गुन्ह्याच्या कबुली बरोबरच अन्य वेगवेगळ्या ठिकाणी संशयित आरोपीकडून 80 हजार रुपयांचे 11 मोबाईलच्या चोरी प्रकरणाचा छडा लागला आहे, शिवाय गुन्ह्यात वापरलेली 65000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, दरम्यान, मोबाईल चोरीप्रकरणी अनिल विश्वनाथ चौगुले वय 47, रा.धुळगांव, ता. तासगांव, जि.सांगली याला शिरोळ पोलीसांनी अटक केली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, दिनबंधू हौसिंग सोसायटी जयसिंगपूर येथील माधुरी देवकुळे यांच्या घरातील मोबाईल चोरीस गेल्याची घटना २१ सप्टेबर रोजी घडली होती. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलच्या तांत्रिक माहितीव्दारे चोरीचा छडा लावला. रेकॉर्डवरील संशयीत चौगुले याला तासगांव येथून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 11 मोबाईल संच व मोटरसायकल जप्त केली.यामध्ये शिरोळ सह शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल चोरी केल्याचे त्याने सांगितले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अशोक सरनाईक, ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, संजय राठोड, युवराज खरात यांनी तपास केला.