वार्ताहर/ खडकलाट
नियमित शाळेला जा, मोबाईलचा जास्त वापर करु नकोस असे आईकडून सांगण्यात येत असल्याचा राग मनात धरुन दि. 1 फेबुवारीपासून घरातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तीन दिवसानंतर नाईंग्लज येथील विहिरीत आढळून आला. दत्तात्रय संजय शिंदे (वय 15) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे निपाणीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दत्तात्रय हा निपाणी येथील एका शाळेत शिकत होता. त्याच्या वडिलांचे 10-12 वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे आई व तो दोघेच नाईंग्लज येथील स्वतःच्या शेतातील घरामध्ये राहत होते. दत्तात्रयला मोबाईलचे व्यसन जडले होते. तो दिवस-रात्र मोबाईलवर गेम खेळत असे. यामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवून शाळेला जाण्याचे प्रमाणदेखील घटले होते. त्यामुळे 31 जानेवारी रोजी त्याच्या आईने मोबाईलचा जास्त वापर करु नकोस म्हणून सुनावले होते. याचा राग मनात धरुन 1 फेबुवारी रोजी दत्तात्रय घरातून पळून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो आढळून आला नाही.
मंगळवारी सकाळी शिंदे यांच्या घराजवळील विहिरीमध्येच दत्तात्रय याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने विहिरीत उडी घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. घटनास्थळी डीएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय संतोष सत्यनायक, फौजदार होसमणी, एन.एच. पुजारी, हवालदार आनंद पांडव आदींनी भेट देवून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मोबाईल व्यसनाचा बळी
आजकाल शालेय विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन जडत असल्याचे दिसून येत आहे. पालकही कोणताही पुढचा-मागचा विचार न करता आपल्या अल्लड पाल्याचा हट्ट पुरविण्याच्या नादात आपल्या अल्पवयीन पाल्याच्या हातात स्मार्टफोन देत आहेत. मात्र या स्मार्टफोनचा वापर तो कसा करत आहे, याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. यातून मुले मोबाईलच्या आहारी जात असून, शिक्षणाकडे मात्र त्यांचा कानाडोळा होत आहे. यातून मुलांना मोबाईलचे व्यसन जडत आहे. यामुळेच दत्तात्रयचा हकनाक बळी गेल्याची चर्चा सुरू होती.









