प्रतिनिधी/ चिपळूण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सवलतीच्या दरात पेट्रोल विक्री केली जाणार असल्याचे युवक काँग्रेसच्या एका पदाधिकाऱयाने जाहीर केले. मात्र यामध्येच मोफत पेट्रोलची अफवा पसरली आणि मिरजोळीतील पेट्रोलपंपावर कॅन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी झुंबड उडाली. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे समजल्यानंतर हात हलवत परतावे लागले. यावेळी काहीसा गोंधळही उडाला. मात्र शेवटी 5 रुपये दरात सवलत देत दिवसभरात दीड हजार लिटर पेट्रोल विक्री करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सवलतीच्या दरात पेट्रोल वाटप करण्यात येणार, असे सोशल मीडियावर युवकच्या एका पदाधिकाऱयाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सकाळपासून मिरजोळी येथील पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागली. कॉग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सुरूवातीला आलेल्या काही वाहनांना सवलतीच्या दरात पेट्रोल देऊन कार्यकर्ते अन्य कार्यक्रमास निघून गेले. मात्र त्यानंतर रांगेत उभे असलेल्या वाहनचालकांना पेट्रोल न मिळाल्याने गोंधळ उडाला. यातच मोफत पेट्रोल दिले जात असल्याची अफवा काहींनी पसरवल्यानंतर पेट्रोलपंपावर गर्दी वाढू लागली. काहीजण वाहनांसह कॅन घेऊन आले. याबाबत वाहनचालकांनी ओरड सुरू केल्यानंतर उर्वरित कार्यकर्तेही तेथून निघून गेले. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. दरम्यान, दुपारी काही पदाधिकारी पेट्रोलपंपावर आल्यानंतर ठरल्यानुसार प्रत्येक लिटरमागे 5 रुपये कमी करून सवलतीच्या दरात पेट्रोल विक्री सुरू झाली. सायंकाळी 7 वाजेपर्यत दीड हजार लिटर पेट्रोलची सवलतीच्या दरात विक्री करण्यात आली.
उपक्रम चांगला, नियोजन जमले नाही!
याबाबत एका वाहनधारकाने सांगितले की, सुरूवातीला काहींना मोफत पेट्रोल देण्यात आले. मात्र वाहनांची गर्दी झाल्यानंतर 50 रुपये दराने पेट्रोल देण्यात आले. मात्र ते ही आवाक्याच्या बाहेर गेल्यानंतर ते बंद करण्यात आले. त्यामुळे गोंधळ वाढला आणि दुपारनंतर सायंकाळपर्यत सवलतीच्या दरात सुरळीतपणे पेट्रोल दिले गेले. युवक कार्यकर्त्यांनी चांगला उपक्रम घेतला, पण नियोजन जमले नाही.









