पेडणे / ( प्रतिनिधी )
मोपा विमानतळ प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्या स्थानिकांना या प्रकल्पात सर्व प्रकारचा रोजगार व्यवसाय उद्योग धंदा मिळावा यासाठी मोपा , उगवे , चांदेल , वारखंड , कासार्वारणे ,हाळी या गावातील स्थानिक युवकांनी पुढाकार घेवून स्थानिक बेरोजगार युवकाना न्याय मिळावा यासाठी मोपा विमानतळ संघर्ष समितीची स्थापना करून जनजागृती गावागावात केली . मोपा विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावे यासाठी संघर्ष चालू आहे . ज्याच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा म्हणून कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता . त्यातील उपसरपंच सुबोध महाले , सिद्धेश महाले व उमेश वारक या तीन : ना पेडणे पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडले होते . हि घटना 21 रोजी घडली.
या घटनेचा निषेध करण्यासाठी उगवे गावातील स्थानिक ग्रामस्थ युवकांनी या चळवळीतील युवकांना पाठींबा देण्यासाठी निषेध बैठकीचे आयोजन केले होते . त्यावेळी स्थानिक पंच प्रसाद महाले , माजी सरपंच दशरथ महाले ,माजी उपसरपंच संतोष महाले व अनंत महाले आदींनी पाठींबा देत या घटनेचा निषेद केला .
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे निमंत्रण
मोपा विमानतळ संघर्ष समितीने निस्वार्थी भावनेने स्थानिकाना न्याय मिळावा या साठी चळवळ उभारलेली आहे . मोठय़ा प्रमाणात जनजागृती आणि चळवळीला दिशा देण्यासाठी वातावरण निर्मिती करायला समितीला यश मिळाले . समितीचे दोन कार्यकर्ते तथा स्थानिक युवक मोपा विमानतळ बांधकाम कंपनी मधील मेघा व्हाईट कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीला कामाला होते . त्यातील दोघानाही कंपनीच्या विरोधात चळवळीत भाग घेतल्याचे कारण देवून कामावरून काढून टाकले . हि घटना 19 रोजी सायंकाळी घडली .या युवकाना कंपनीच्या अधिकाऱयांनीच मारहाण केल्याची तक्रार 19 रोजी रात्रीच पेडणे पोलीस स्टेशनवर दिली. या तक्रारीची कोणतीच दखल न घेता आणि 20 रोजी सायंकाळी साडेचार वाजता कंपनीने या युवकावर विरोधात तक्रार देताच सुबोध महाले, सिद्धेश महाले आणि उमेश वरक याना अटक केली व जामिनावर सोडले. त्याचवेळी काही समर्थकांनी पेडणे पोलीस स्टेशनवर धडक मारून हे आंदोलन गोवाभर पेटवण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान या आंदोलन चळवळीची गंभीर दखल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घेतली असून कुणाचेही काहीही प्रश्न समस्या असतील तर ते बसून सोडवण्याची सूचना केली . समितीच्या कार्यकर्त्यांनी येवून बसून चर्चा करुया व त्यावर तोडगा काढूया अशी सूचना करून चर्चेला आमंत्रण दिल्याची माहिती मोपा विमानतळ संघर्ष समितीचे निमंत्रक तथा मोपा उपसरपंच सुबोध महाले यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणतात आंदोलने नको चर्चा करुया ?
25 रोजी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अबकारी इमारतीचे उद्घाटन करायला पेडणेत आले होते . त्यावेळी जाहीर बोलताना जे जे पेडणे तालुक्मयात प्रकल्प येतात त्यात स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे . कुणावरही अन्याय होणार नाही . मात्र कुणीच आंदोलन करू नये , बसून चर्चा करावी , सरकार तयार आहे बसून चर्चा करून विषय सोडवण्यासाठी , त्याच अनुषंगाने मोपा विमानतळ संघर्ष समितीला चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे .
आम्हाला न्याय हवा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत : सुबोध
संघर्ष समितीचे निमंत्रक सुबोध महाले यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना , आमच्यावर अन्याय झाला . आम्ही आमच्या हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गाने लढत आहोत . ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांतील कुटुंबातील सदस्यांना प्राधान्यक्रमाने नोकऱया मिळायला हव्यात , स्थानिकांच्या हितासाठी आमचा लढा आहे .राज्यकर्त्यांच्या हातातील आम्ही बाहुले नाहीत . आम्ही आमच्या मागण्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चेच्या वेळी सदर करणार आहोत . आम्ही चर्चेला तयार असल्याचे महाले आणि सांगितले .
या प्रकरणात राजकर्त्याचा हात : दशरथ महाले
माजी सरपंच दशरथ महाले यांनी या निषेध बैठकीत बोलताना आमच्या तीन युवकाना अटक करण्यामागे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि ज्ञानेश्वर परब यांचा हात आहे . पोलिसावर राजकीय दबाव घालून खोटय़ा तक्रारी करणाऱया कंपनीला पाठींबा देवून जे चळवळ उभारतात त्यांना शिक्षा देण्याचे धोरण लोकप्रतिनिधीचे आणि सरकारचे योग्य नसल्याचे सांगितले . उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा कर्मचारी ज्ञानेश्वर परब हे वारंवार पोलीस स्टेशनवर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी याना फोन करायचे त्यांचा जास्त हात असल्याचा दावा करत हे सत्य नाही तर परब यांचा फोन तपासावा अशी मागणी केली .
स्थानिकावर अन्याय नको : संतोष महाले
लोकशाहीच्या मार्गाने अन्याय झाला कि न्याय मिळावा यासाठी चळवळ उभारणाऱया विरोधात खोटय़ा तक्रारी नोंद करून अटक केली जाते , तर मग कंपनीच्या विरोधात ज्या स्थानिक युवकांनी तक्रार दिली त्याला आजपर्यंत अटक का केली नाही , असा सवाल उपस्थित करून , तिघा युवकाना अटक केल्याच्या घटनेचा निषेध केला .









