अमेरे, निगळ, उगवे भागात आलेल्या आपत्तीला भाजपच जबाबदार : विधानसभेत आवाज उठविणार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर
प्रतिनिधी /पेडणे
मोपा विमानतळ पठारावरील पाणी मोपा परिसरातील अमेरे, निगळ, उगवे आदी भागात येते. ही आपत्ती भाजपमुळे आली आहे. याबाबत विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित करून शेतकऱयांच्या आणि ग्रामस्थांच्या भावनांची सरकारने कदर करण्याची मागणी करणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. अमेरे पेडणे येथे भेट देऊन पाहणी केल्याप्रसंगी ते बोलत होते.
मोपा विमानतळ पठारावरील पाणी अमेरे, निगळ तसेच उगवे आदी भागात सोडण्यात आल्याने या भागातील शेती आणि बागायती नष्ट झाली आहे. मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी परिसराची पहाणी केली. गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, प्रवक्ते संजय बर्डे, वकील जितेंद्र गावकर, सचिव प्रणव परब, बया वरक आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नियोजनाच्या अभाव असल्याने परिणाम
यावेळी पञकारांकडे बोलताना अमित पाटकर म्हणाले, सोमवरपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मोपा पठारावरुन येणारे पावसाचे पाणी शेती बागायतीत पाणी घुसले. हे मनुष्यनिर्मित आपत्ती आहे. विमानतळ बांधून शेतकऱयांना संपविण्याचा हा प्रकार असून सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्याबाबत अहवालही दिला होता मात्र तो समाधानकारक नव्हता. मोपा पठारावरून येथून येणाऱया पाण्याची क्षमता पाहून नाला बांधाण्याची गरज होती. या भागातील शेतकऱयांच्या जमिनी, शेती, बागायती गेल्या. गेल्या चार वर्षांपासून ही स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी सरकारने जीएमआरला दोषी ठरवून स्थानिक लोकांना न्याय देणे आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण गावच बुडण्याची भीती आहे. सरकारने या प्रकरणी त्वरित उपाययोजना करावी, असे आवाहन केले.
सरकारकडे व्हिजन नाहीः संजय बर्डे
मोपा विमानतळ प्रकल्प बांधताना न्यायालयाने अनेक मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. मात्र त्याची पायमल्ली होत असून हा विमानतळ प्रकल्प उभारताना सरकारी अधिकाऱयांचे मार्गदर्शन घेतले नाही का? जीएमआर कंपनी ही सरकारला जुमानत नसून सरकारकडे व्हिजन नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे यांनी केला.
दुसऱया दिवाशीही अमेरे भागात पाणी घुसून आपल्या घरासह अन्य दोन घरांमध्ये पाणी घुसले, अशी कैफियत स्थानिक रहिवाशी गडेकर यांनी मांडली. मात्र जीएमआर कंपनीच्या अधिकाऱयांकडून कोणतीही दखल घेतली नाही. सरकारी अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी गडेकर यांनी केली.
न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन : ऍड. जितेंद्र गावकर
काँग्रेसचे पदाधिकारी वकील जितेंद्र गावकर म्हणाले, मोपा विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱयांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र त्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही. आता मोपा विमानतळ शेजारचे गावा उद्ध्वस्त होत आहे. मोपा पठारावलील माती, दगड आणि पाणी हे योग्य नियोजन नसल्याने गावातील शेती आणि बागायती नष्ट करण्याचे काम कंपनी करत आहे. सरकारने आणि न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे ही गुंडाळून ठेवून मोपा विमानतळ बांधण्यात आला आहे, असे जितेंद्र गावकर म्हणाले.









