प्रतिनिधी/ पणजी
बनावट दस्तावेज तयार करून मोपा विमानतळाची 74 हजार 800 चौ.मी. जमीन 15 कोटी रुपयांना विकल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला असून मोपा विमानतळ विकण्याच्या प्रकारात लक्ष घालावे, असे पत्र नागरी विमनोड्डान संचालनालयाच्या संचालकांनी गुन्हा अन्वेषण विभागाला लिहिल्याने फसवेगिरीच्या तपासाला गती आली आहे.
भादंसच्या कलम 193, 209, 205, 404, 406, 419, 420, 465, 466, 468, 471 सह कलम 34 व 120 सी खाली गुन्हा अन्वेषण विभागाने प्रँकी आग्नेलो गोन्साल्वीस व केनिथ सिल्वेरा नामक दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला आहे. दिल्ली येथील एका बडय़ा व्यक्तीने (डायरेक्टर ऑफ सिव्हील एव्हीगेशन) नागरी विमानोड्डान संचालकांना पत्र लिहून मोपा विमानतळ बांधण्यास हरकत घेतली होती. ज्या ठिकाणी मोपा विमानतळाची धावपट्टी येत आहे. ती जमीन आपल्या मालकीची असून 2010 साली त्याने सुमारे 15 कोटी रु. देऊन 74 हजार 800 चौ. मी. जमीन खरेदी केली होती. ही जमीन सरकारने ताब्यात न घेता त्यावर विमानतळ बांधण्यात आला, असा त्याचा दावा होता.
जमीन विकणाऱयाने सदर जमीन मोपा विमानतळाच्या बाजूची जमीन असल्याचे दाखवले होते. व या जमिनीवर नंतर तारांकित हॉटेल बांधता येईल. या हेतूने त्याने ती जमीन विकत घेतली होती. विक्रीपत्रावर फक्त 15 कोटी रुपये दर्शविले असले तरी प्रत्यक्षात कित्येक पटीने रोख रक्कम खर्च करण्ग्नयात आल्याचा त्यांचा दावा आहे.
मृत महिलेच्या नावे बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी
सदर वादग्रस्त जमीन 74 हजार 800 चौ.मी. असून हा सर्वे एक चौदाच्या उताऱयात लक्ष्मीबाई मडवळ नामक महिलेचे नाव लागले आहे. अनेक वर्षांपूर्वी या महिलेचे निधन झाले आहे. या मृत महिलेच्या नावे दि. 29 नोव्हेंबर 2007 साली केनिथ सिल्वेरा नामक व्यक्तीने इरिव्होकेबल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतली. ही पॉवर ऑफ ऍटर्नी एका नोटरीसमोर नोंदणीकृत झाली आहे. बनावट महिलेला लक्ष्मीबाई मडवळ म्हणून भासवून एका मृत महिलेची पॉवर ऑफ ऍटर्नी नोंदणीकृत करून घेणारा नोटरी वकीलही गोत्यात आला आहे. या पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारे दि. 29 जुलै 2010 रोजी सदर जमीन 15 कोटी रुपयांना विकण्यात आली. ही जमीन त्यापूर्वी मोपा विमानतळासाठी ताब्यात घेण्यात आल्याची पूर्ण कल्पना असूनही पेडणे रजिस्ट्रारने सदर विक्रीपत्र नोंदणकृत करून घेतले.
लक्ष्मीबाई मडवळच्या वारसांना नुकसानभरपाई
सदर जमीन मोपा विमानतळासाठी ताब्यात घेण्यात आल्याने दि. 13 जून 2011 रोजी नुकसानभरपाई जाहीर झाली. ही नुकसानभरपाई लक्ष्मीबाई मडवळ याच्या वारसदारांच्या नावे जाहीर झाली आहे. आपण 15 कोटी रुपये दिल्याने नुकसानभरपाई आपल्याला मिळायला हवी, असा दावा तक्रारदाराने भूसंपादन अधिकाऱयाकडे केला आहे.
आपण जमीन विकत घेण्यापूर्वी मूळ जमिनीच्या मालकीणीला भेटलो नाही. तिच्या वारसदारांनाही आपल्याला भेटू दिले नाही. ती कासारवर्णे पेडणे येथे राहत असल्याचे समजले मात्र पॉवर ऑफ ऍटर्नीवर तिचा रहिवासी पत्ता अंधेरी मुंबई येथील असल्याचे आढळले. अंधेरी मुंबई येथील त्या पत्त्यावर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ती इमारत सरकारी इमारत होती व ती कधीचीच पाडली गेली असून त्या ठिकाणी आता काहीच नसल्याचे तक्रारादाचे म्हणणे आहे.
15 लाख रुपये कोणाच्या खात्यात गेले
लक्ष्मीबाई मडवळ या नावाने कुठल्या महिलेला पॉवर ऑफ ऍटर्नीवर सही करायला लावली. एकूण 15 लाख रुपये चेकच्या रुपात देण्यात आले होते. ते नेमके कोणाच्या खात्यात गेले. याचा तपास आता होणे बाकी आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.









