सुकेकुळण ते मोपा विमानतळ ‘लिंक हायवे’ला विरोध : शेतजमिनीवर नांगर न फिरविण्याची होती मागणी ,पोलिसांनी आंदोलकांना घेरल्याने वातावरण चिघळले
पेडणे / प्रतिनिधी
मोपा विमानतळावर जाण्यासाठी धारगळ सुकेकुळण ते मोपा प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी नवीन राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार काल शुक्रवारी 19 रोजी 500 पेक्षा जास्त पोलीस फोर्स घेऊन सरकारने सर्वेक्षण करण्याची तयारी चालवली असताना पीडित शेतकऱयांनी एकत्रित होऊन मोपा परिसरातील या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला. विरोध करणाऱया शेतकरी तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना, संघटनांच्या पदाधिकाऱयांना मिळून सुमारे 80 जणांना पोलिसांनी अटक करुन बसमध्ये कोंबून त्यांना म्हापसा व हणजणू पोलीस स्थानकात नेले.
सरकारने मोपा विमानतळ प्रकल्पावर जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी सुमारे 80 मीटर रुंदीचा महामार्ग करण्यासाठी स्थानिक शेतकऱयांना अंधारात ठेवून ही प्रक्रिया सुरु केली आहे. याला शेतकऱयांनी आणि विविध संघटनानी विरोध केला आहे. याबाबत शेतकऱयांचे म्हणणे ऐकून न घेता बळजबरीने सरकार शेतकऱयांच्या जमिनी हडप करत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. काल शुक्रवारी भूसंपादन विभागाचे अधिकारी सकाळी येणार याची कल्पना असल्याने लोक विरोध करण्यासाठी जमले होते. यावेळी मोठ पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
आमच्या जमिनी घेण्यापूर्वी आमच्यावर गोळय़ा घाला
आमच्या जमिनी घेण्यापूर्वी आमच्यावर गोळय़ा घाला आणि खुशाल जमिनी घ्या. मात्र जिवंत असेपर्यंत आम्ही जमिनी देणार नाही. अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्याकडून देण्यात आल्या. आमची जमीन आमका जाय, एक दो एक दो बाबू आजगावकर को फेक दो, अशा घोषणा देवून आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. परिसराला छावणीचे स्वरूप आले होते, मोठय़ा प्रमाणात पोलीस फौज फाटा मागितला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर पाण्याचे फवारे मारण्यासाठी टँक आणले होते.
पोलिस संरक्षणात सर्वेक्षणाचे काम सुरु
पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱयांनी आंदोलन करणाऱया शेतकरी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्ते संतप्त बनत होते. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्याना अटक केली. नंतर पोलीस संरक्षणात भूसंपादन विभाग अधिकाऱयांनी सर्वेक्षणाचे काम सुरु केले.
विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक
आंदोलनात सहभागी झालेले गोवा फॉरवर्ड पक्षाचे पेडणेचे नेते वकील जितेंद्र गावकर, गोवा सुरक्षा मंचचे विनायक च्यारी, धारगळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, मगोचे नेते प्रवीण आर्लेकर, संदीप कांबळी, मोपा संघर्ष समितीचे नारायण गडेकर, व शेकडो महिला आंदोलनकर्त्याना अटक करण्यात आली. नंतर त्यांना म्हापसा व हणजुणे पोलीस स्टेशनवर नेण्यात आले.
मोठा पोलीस फौजफाटा तैनात
यावेळी मोपा विमानतळ मुख्य गेटजवळ मोठय़ा प्रमाणात पोलीस ठेवण्यात आले होते. सुमारे 500 पोलीस तसेच राखीव पोलीस कुमक पाचारण करण्यात आली होती. शेमेचे आडवण येथे सकाळी म्हापसाचे उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, डिचोली पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक संदेश चोडणकर, पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर, मामलेदार अनंत मळीक, पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, हरिष वायंगणकर, विवेक हळर्णकर, जमीन भूसंपादन विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेटकर, सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग अधिकारी आत्माराम गावडे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी राविशेखर निपाणीकर यांच्याकडे चर्चा करताना विनायक च्यारी यांनी बोलताना लोकांच्या पोटावर नागर फिरून जमिनी घेवू नका, सर्वेक्षण थांबवा अशी मागणी केली. यापुर्वी आम्ही सरकारला निवेदन दिले, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, आम्ही अजून न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असे सांगितले. त्यावर उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत शेतकऱयांची चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांना जी हमी दिली ती पूर्ण केली जाणार आहे. पिडीत शेतकऱयांना कायमच्या नोकऱया दिल्या जाणार आहेत. सर्वेक्षण कायदेशीर असून त्याला कुणी अडथळा आणला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तुमच्या काही मागण्या असतील तर त्या भूसंपादन अधिकाऱयांकडे शांततेत मांडा. अशी सूचना केली असता आंदोलनकर्ते अधिक संतप्त झाले आणि त्यांनी घोषणा सुरु केल्या.
परंतु तोपर्यंत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना चारही बाजूने घेरले होते. ज्ञानेश्वर वरक हा युवक घटनेचे चित्रीकरण करत होता, पोलिसांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याने आपले ओळखपत्र पोलिसाना दाखवले तरीही त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.









